धाराशिव : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सध्या बॅनरवॉर नाही, तर ‘बॅनर-पॉलिटिक्स’चा नवा अध्याय लिहिला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत राज्याचे माजी मंत्री आणि पक्षाचा एक मोठा चेहरा, डॉ. तानाजी सावंत. त्यांना पक्षांतर्गत आणि विशेष म्हणजे, घरच्याच व्यक्तींकडून पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचा ‘सुपारी डाव’ तर आखला जात नाही ना? अशी थेट शंका आता कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषकांना येऊ लागली आहे.
पहिले सावट: सख्ख्या भावाच्या मेळाव्यातूनच मंत्री ‘आऊट’
राजकीय पटावरची पहिली आणि सर्वात मोठी खेळी समोर आली ती माढा मतदारसंघात. तानाजी सावंत यांचे सख्खे बंधू, शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित केला. मात्र, या मेळाव्याच्या बॅनरवर आणि मंचावरही मंत्री तानाजी सावंत यांना स्थान देण्यात आले नाही. ही नजरचूक होती, असे मानणे म्हणजे निव्वळ राजकीय भोळेपणा ठरेल. हा एक थंड डोक्याने आखलेला डाव होता, हेच यातून स्पष्ट दिसते.
दुसरे सावट: मतदारसंघातच दुसऱ्या ‘सावंतांचा’ उदय
एकीकडे भावाने डावलले असताना, दुसरीकडे धनंजय सावंत यांच्या कार्यकर्त्यांनीही तीच री ओढली. तानाजी सावंत यांच्याच मतदारसंघात धनंजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेल्या बॅनरवरूनही मंत्री महोदयांचा फोटो गायब होता. गंमत म्हणजे, एकेकाळी “बॅनरवर फोटो नसणे हा अपमान आहे,” अशी गर्जना करणारेच आज या ‘अपमानावर’ सोयीस्कर मौन बाळगून आहेत. ही शांतता खरोखरच ‘संकल्पपूर्वक’ आहे का?
तिसऱ्या सावंताची धास्ती? की नेतृत्वालाच आव्हान?
या ‘सावंत विरुद्ध सावंत’ नाट्यात आणखी एक कोन समोर येतोय तो म्हणजे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा. जिल्ह्यात साळुंके यांची वाढती लोकप्रियता आणि मजबूत होत असलेले संघटन कौशल्य काहींच्या डोळ्यात खुपतंय का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. एकीकडे तानाजी सावंतांना बॅनरवरून हटवून राजकीय संदेश दिला जात आहे, तर दुसरीकडे साळुंके यांच्या नेतृत्वाला जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न तर नाही ना?
हा भाऊबंदकीचा वाद नव्हे, सत्तेचा संघर्ष आहे!
ही केवळ बॅनरवरील जागेची लढाई नाही, तर ही नेतृत्वावर छाया टाकण्याचा गंभीर प्रयत्न आहे. ज्या तानाजी सावंत यांनी पक्षासाठी आणि धाराशिवच्या विकासासाठी अनेक वर्षे खर्ची घातली, त्याच नेत्याला जेव्हा घरातूनच आव्हान दिले जाते, तेव्हा सामान्य कार्यकर्त्याच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो – ही निष्ठा आता काहींसाठी ‘ भीती’ बनली आहे का?
सध्यातरी “तीन सावंतांच्या नावाने सुरू झालेला हा खेळ, एका सावंताला संपवण्याच्या दिशेने झुकतोय,” हेच धाराशिवच्या राजकारणाचे कटू वास्तव आहे. मात्र, राजकारणात बॅनरवरच्या प्रतिमेपेक्षा जनतेच्या मनातील प्रतिमा अधिक महत्त्वाची असते आणि ती जागा कोणी घेतली आहे, हे येणारा काळच ठरवेल.