उमरगा – उमरगा शहरात वाहतुकीचे नियम सर्रासपणे मोडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका विशेष मोहिमेअंतर्गत, उमरगा पोलिसांनी तब्बल २६१ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून एकूण २ लाख २१ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
मागील काही काळापासून उमरगा शहरात ट्रिपल सीट प्रवास करणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, विनापरवाना वाहन चालवणे आणि मोबाईलवर बोलत वाहन चालवण्यासारख्या प्रकारांमध्ये वाढ झाली होती. यामुळे लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले होते. या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी उमरगा पोलिसांनी गुरुवारी, दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत एक विशेष मोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान, पोलीस ठाण्यासमोर आणि शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर नाकाबंदी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली. यामध्ये:
- १९१ वाहनचालकांवर ऑनलाइन पद्धतीने १,५१,५०० रुपये दंड आकारण्यात आला.
- ७० वाहनचालकांना ऑफलाइन पावती देऊन ६०,००० रुपये दंड ठोठावण्यात आला.
अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांना इशारा
यापुढे अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्या पालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच, सर्व वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि राष्ट्रीय महामार्गावर आपली वाहने अस्ताव्यस्त उभी करू नयेत, असे आवाहन उमरगा पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, स.पो.नि. पांडुरंग कन्हेरे, पोउपनि चाटे, पोउपनि गजानन पुजरवाड आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली.