धाराशिव – आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या जागी मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही पदरी निराशा पडल्याने, एका हताश आईने आपल्या मुलासह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा टोकाचा इशारा दिला आहे.येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी, स्वातंत्र्यदिनी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ध्वजस्तंभासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन संघमित्रा संजय नागटिळक आणि त्यांचा मुलगा संघर्ष संजय नागटिळक यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
संघमित्रा नागटिळक यांचे पती, संजय काशिनाथ नागटिळक, हे भूम तालुक्यातील सुकटा येथील दत्त शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती शिवाजी विद्यालयात २८ वर्षे सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे २२ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. पतीच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातच, संघमित्रा यांना स्वतः ५ एप्रिल २०२४ रोजी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करावी लागली, ज्यामुळे कुटुंबाच्या अडचणीत आणखी भर पडली.
संघर्ष नागटिळक यांनी वडिलांच्या निधनानंतर बी.ए. आणि बी.एड. ही पदवी प्राप्त केली आहे.शिक्षण पूर्ण होताच, वडिलांच्या जागी सहशिक्षक म्हणून नोकरी मिळावी यासाठी त्यांनी आणि त्यांच्या आईने वरिष्ठ शिक्षण कार्यालय तसेच मंत्रालयाकडे अनेकदा अर्ज केले. मात्र, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाने त्यांच्या अर्जांना केराची टोपली दाखवली आणि कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा आरोप नागटिळक कुटुंबाने केला आहे.
वाढत्या महागाईत उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने आणि प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने नाविलाजास्तव हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. १५ ऑगस्ट २०२५ पूर्वी मुलास नोकरी न मिळाल्यास होणाऱ्या परिणामांना छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक, दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सचिव, तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद धाराशिव, हे सर्वस्वी जबाबदार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या निवेदनाच्या प्रती माहिती आणि कार्यवाहीसाठी शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणामुळे शिक्षण आणि प्रशासन वर्तुळात खळबळ उडाली आहे.