ढोकी – येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा फोडून अज्ञात चोरट्यांनी तिजोरीत ठेवलेली ३ लाख ३१ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बँकेच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. ही घटना शनिवार, दि. २ ऑगस्ट ते सोमवार, दि. ४ ऑगस्ट या सुट्टीच्या कालावधीत घडली.
याप्रकरणी बँकेचे शाखा अधिकारी प्रताप प्रल्हादराव माने (वय ५६) यांनी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोकी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या दक्षिण बाजूला असलेल्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बँकेतील तिजोरी फोडून त्यातील ३,३१,५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
सोमवारी (दि. ४) सकाळी दहाच्या सुमारास शाखा अधिकारी प्रताप माने आणि इतर कर्मचारी बँकेत आले असता, त्यांना खिडकीचे गज तुटलेले दिसले. आत तपासणी केली असता तिजोरीतील रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ढोकी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रताप माने यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३३१(३) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीतील बँकेत झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.