धाराशिव – बनावट पोलीस जबाब तयार करून बदनामी केल्याच्या आरोपाखालील प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, धाराशिव यांनी तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ दिगंबर माने यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश-४ एस.जी. थुबे यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या सुनावणीनंतर हा निर्णय दिला. मात्र, माने यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची संधी देत न्यायालयाने १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंतरिम संरक्षण मंजूर केले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
६ मे २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर क्रमांक ०१८९/२०२५ नुसार, विशाल विजयकुमार छत्रे यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, राजाभाऊ माने यांनी एक खोटा पोलीस जबाब तयार करून, त्यात विशाल छत्रे यांचा ड्रग्ज विक्री प्रकरणात सहभाग असून त्यांना स्थानिक आमदारांचे राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप केला. हा बनावट जबाब विविध व्हॉट्सॲप ग्रुप्सवर प्रसारित करून छत्रे यांची बदनामी केल्याचा आरोप आहे.
छत्रे यांनी जेव्हा तामलवाडी पोलीस ठाण्यातील मूळ ड्रग्ज प्रकरणाच्या (गुन्हा क्र. २२/२०२५) दोषारोपपत्राची पाहणी केली, तेव्हा त्यात माने यांचा असा कोणताही जबाब नोंदवला नसल्याचे आणि तो न्यायालयीन कागदपत्रांचा भाग नसल्याचे आढळले. यानंतर छत्रे यांनी खोटी कागदपत्रे तयार करून ती प्रसारित करण्याचा गुन्हा दाखल केला.
एफआयआरमधील मुख्य तपशील
- जिल्हा: धाराशिव
- पोलीस ठाणे: तुळजापूर
- एफआयआर क्रमांक: ०१८९/२०२५
- घटनेची तारीख: ०३ मे २०२५
- आरोपी: राजाभाऊ दिगंबर माने
- फिर्यादी: विशाल विजयकुमार छत्रे
- लागू कलमे: भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ – कलमे ३३५, ३३६, ३३७, ३४९, ३४०
न्यायालयाचा निर्णय
सुनावणीत, जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. मात्र, अर्जदाराच्या वकिलांनी ( ऍड. विशाल साखरे ) उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी १५ दिवसांची मुदत मागितल्याने, न्यायालयाने पोलिसांना १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत आरोपीवर कोणतीही जबरदस्तीची कारवाई न करण्याचे निर्देश दिले.