भूम/परंडा: “राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो,” ही उक्ती खरी ठरवत, परंडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी अखेर ‘दादां’चं घड्याळ हाती बांधलं आहे. शरद पवार गटाला ‘रामराम’ ठोकत त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने, धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. पण हा भूकंप केवळ पक्षबदलाचा नसून, त्यामागे दडलेल्या निधीच्या ‘अर्थ’कारणाची, नात्यागोत्यांच्या ‘सोयरीकी’ची आणि कट्टर वैरी एकत्र येण्याची एक मसालेदार पटकथा आहे.
‘स्थगिती’चा अर्थ आता लागला?
गेले चार महिने धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा तब्बल २६८ कोटींचा निधी स्थगितीच्या गर्तेत अडकला होता. आता मोटे यांच्या पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही स्थगिती उठवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे, “हा निधी मोटे यांच्या पक्षप्रवेशासाठीच थांबवला होता का?” असा खोचक सवाल ठाकरे गटाने विचारला असून, या ‘योगायोगा’मुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.
सोयरीकीच्या मांडवात राजकीय डाव!
या सगळ्या प्रकरणाला एक कौटुंबिक किनारही आहे. अजित पवार हे तुळजापूरचे भाजप आमदार राणा पाटील यांच्या आत्याचे पती, तर दुसरीकडे ते राहुल मोटे यांच्या मावशीचेही पती आहेत. म्हणजेच, कालपर्यंत एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले राणा पाटील आणि राहुल मोटे हे नात्याने चुलत-मावसभाऊ आहेत! आता हे दोन्ही भाऊ ‘महायुती’ नावाच्या एकाच राजकीय मांडवात आल्याने परंड्यातील समीकरणे पार बदलून गेली आहेत.
एका म्यानात दोन तलवारी!
राहुल मोटे यांचा खरा राजकीय संघर्ष आहे तो विद्यमान आमदार आणि शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांच्याशी. सलग दोन वेळा मोटे यांना सावंत यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता मोटे आणि सावंत हे दोघेही महायुतीचेच घटक बनल्याने, ‘एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार?’ हा प्रश्न तमाम परंडा मतदारसंघाला पडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन नेत्यांमधील शीतयुद्ध महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार, हे निश्चित!
महाविकास आघाडीला दगा?
अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानुसार, मोटे यांनी लोकसभा निवडणुकीत राणा पाटील यांच्या पत्नीचा ‘छुपा’ प्रचार केला होता. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म म्हणून ठाकरे सेनेने आपला उमेदवार मोटे यांच्यासाठी मागे घेतला होता. त्यामुळे मोटे यांनी महाविकास आघाडीला दगा दिल्याचा आरोपही आता जोर धरू लागला आहे.
एकंदरीत, नेत्यांच्या पक्षबदलात, नात्यागोत्यांच्या राजकारणात आणि निधीच्या खेळात धाराशिव जिल्ह्याचा विकास मात्र ‘स्थगित’ झाला असून, जनता केवळ या राजकीय तमाशाची प्रेक्षक बनून राहिली आहे.
स्थळ: परंड्याच्या गावच्या चावडीवरचा कट्टा
पक्या: आरं भावड्या, ऐकलं व्हय रं… च्या मारी! लई मोठं राजकारण झालंय आपल्या परंड्यात!
पेंद्या: काय झालं? कुणी कुणाचं काय नेलं का परत?
पक्या: आरं नेलं न्हाय, आणलंय! आपल्या मोटे साहेबांनी शरद पवारांची तुतारी फेकून दिली आन थेट अजितदादांचं घड्याळ बांधलंय मनगटाला! गेले दादांच्या गटात!
भावड्या: त्यो काय आजचा इषय हाय व्हय? ही तर चार म्हैन्यापासून शिजणारी खिचडी हाय. जिल्ह्याच्या निधीचं गाडं अडवून ठेवलं व्हतं २६८ कोटींचं, ते काय येड्यावानी व्हय? मोटे साहेबास्नी जाळ्यात ओढायचाच डाव होता त्यो सगळा! आता बघा, दोन दिवसांत स्थगिती उठलीच म्हणून समजा!
पेंद्या: आरं थांबा… थांबा… माझ्या डोक्याचा भुगा झालाय… म्हंजी, अजितदादा… ते तुळजापूरच्या राणा पाटलांच्या आत्याचे यजमान… आन तेच आपल्या मोटे साहेबांच्या मावशीचे बी यजमान… आरं देवा! म्हंजी हे दोघं चुलत-मावसभाऊ झाले का रं? कालपर्यंत कुस्त्या खेळत व्हते, आता एकाच पंगतीला बसणार!
भावड्या: अगदी बरोबर! हीच तर हाय खरी सोयरीकीची गोम! सगळी नातीगोती आता एकाच तंबूत! ह्यास्नी लोकांचं काय घेणंदेणं? फक्त खुर्ची महत्त्वाची.
पक्या: पण गड्या, खरी मेख तर पुढंच हाय! आता मंत्री तानाजी सावंत आन आपले मोटे साहेब… हे कट्टर दुश्मन एकाच महायुतीच्या तंबूत! एका म्यानात दोन वाघ कसे रं राहणार? नुसता धुरळा उडणार बघ!
भावड्या: त्यांचं राहू दे नायतर एकामेकाला खाऊ दे. आपलं काय? आपल्या तालुक्याच्या इकासाचं काय? लोकसभा निवडणुकीत मोटे साहेबांनी आतून राणा पाटलांच्या बायकोला मदत केली, तरीबी ओमराजेंनी त्यांना सव्वातीन लाखांनी पाडलं! आता हे सगळे नात्यातले गडी एका बाजूला येऊन आपल्या तोंडाला पानं पुसणार.
पेंद्या: खरं हाय तुझं… ह्यांच्या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणात आपलं सामान्य माणसाचं मात्र पार वाट लागलीया. विकास तर ठप्पच हाय.
भावड्या: मंग काय! आपण फक्त पारावर बसून ह्यांच्या भानगडीच्या चिवडा-चर्चा करायच्या! बाकी आपल्या हातात काय हाय? भोपळा!
पक्या: खरंय… डोक्याला लय ताप झालाय. चल रं, एक-एक कटिंग मारू… म्हणजे तरतरी येईल जरा!