धाराशिव: रात्रीच्या गस्तीसाठी जात असताना धाराशिव पोलीस दलाच्या वाहनाला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनातील अन्य पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही दुःखद घटना चोरखळी – येरमाळा दरम्यान घडली. श्रीराम कांबळे असे मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी बुधवारी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी आपल्या पोलीस व्हॅनमधून निघाले होते. चोरखळी आणि येरमाळा दरम्यानच्या मार्गावर असताना, एका भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने पोलीस व्हॅनला मागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पोलीस व्हॅनचा यात चुराडा झाला.
या अपघातात व्हॅनमध्ये असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कांबळे हे गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनात असलेले इतर पोलीस कर्मचारी देखील या अपघातात जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी पोलिसांवर उपचार सुरू असून, या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे. कर्तव्यावर असताना पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने धाराशिव पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.