धाराशिव: बनावट स्टॅम्प पेपर तयार करून त्यावर जमिनीच्या मूळ मालकाची खोटी सही करत घर आणि जमीन बळकावून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शेषेराव शंकरराव जावळे पाटील (वय ५८, रा. नागुर, ता. लोहारा) यांच्या मालकीची नागुर येथील गट क्रमांक ११७/०१ मधील ७४ आर जमीन आणि त्यावरील प्लॉट क्रमांक ३४८ वर बांधलेले घर आहे.
आरोपी दिनकर पाटील, रमेश पांडुरंग पाटील आणि अनिल देवराव चंदनशिवे (सर्व रा. नागुर, ता. लोहारा) यांनी संगनमत करून या मालमत्तेचे बनावट दस्तऐवज तयार केले. फिर्यादीच्या माहितीनुसार, आरोपींनी ८ डिसेंबर २०१७ रोजी धाराशिव येथील न्यायालयाजवळील तानवडे यांच्या कार्यालयात एक बनावट स्टॅम्प पेपर तयार केला. त्यावर फिर्यादी शेषेराव जावळे यांची खोटी सही करून संपूर्ण मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला व त्यांची फसवणूक केली.
या फसवणुकीच्या विरोधात शेषेराव जावळे यांनी बुधवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४६५ (बनावट दस्तऐवज तयार करणे), ४६७ (किंमती रोख्याची बनावट करणे), ४६८ (फसवणुकीसाठी बनावटगिरी करणे), ४७१ (बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे) आणि ३४ (समान उद्देशाने गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.