धाराशिव: धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अवास्तव कमी केल्याने वडगाव (सि) येथील शेतकरी अडचणीत आले आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुरुवातीला निश्चित केलेला प्रति एकर ८० लाख रुपयांचा दर, नगर रचनाकार कार्यालयाच्या हस्तक्षेपानंतर अवघ्या १४ लाख रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून या चुकीच्या आणि बेकायदेशीर निवाड्यांमध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
आमदार घाडगे-पाटील यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी (CALA) यांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार तीन वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहारांच्या आधारे प्रति एकरी ८० लाख रुपये दर निश्चित केला होता. मात्र, हे प्रारूप निवाडे सहाय्यक संचालक, नगर रचनाकार यांच्याकडे पाठवण्यात आले, ज्यासाठी कायद्यात कोणतीही तरतूद नाही, असे आमदारांनी म्हटले आहे.
नगर रचनाकार कार्यालयाने एकूण ५३ खरेदी व्यवहारांपैकी ३३ व्यवहार वगळून केवळ १३ व्यवहारांच्या आधारावर जमिनीचे मूल्यांकन केले. विशेषतः, ०.४० आर पेक्षा कमी क्षेत्राचे खरेदीखत वगळल्यामुळे जमिनीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. धक्कादायक बाब म्हणजे, माहितीच्या अधिकारात विचारणा केली असता, ०.४० आर पेक्षा कमी क्षेत्राचे व्यवहार वगळण्याची कायद्यात किंवा शासन परिपत्रकात कोणतीही तरतूद नसल्याचे सहाय्यक नगर रचनाकार कार्यालयाने स्वतः लेखी कळवले आहे.
यापूर्वी २८ फेब्रुवारी २०२४ रोजी आमदार घाडगे-पाटील यांनी तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडेही हे प्रकरण मांडले होते. त्यांनी विभागीय आयुक्तांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते; तथापि, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य आदेश द्यावेत आणि वडगाव (सि) येथील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना योग्य मोबदला मिळवून द्यावा, अशी विनंती आमदार घाडगे-पाटील यांनी केली आहे.