उमरगा : तीन महिलांनी संगनमत करून एका २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उमरग्यात उघडकीस आली आहे. जवळपास पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या या हत्येप्रकरणी मयत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी तीन महिलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अभिषेक कालिदास शिंदे (वय २३, रा. मुन्शी प्लॉट, उमरगा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ ते २५ जुलै रोजी सकाळी ७:३० च्या दरम्यान घडली. उमरगा येथील बायपास रोडलगत असलेल्या आरती मंगल कार्यालयाच्या शेजारी, अंकुश शिंदे यांच्या शेताजवळ अभिषेक शिंदे यांचा मृतदेह आढळून आला होता.
याप्रकरणी मयत अभिषेकचे वडील कालिदास संभाजी शिंदे (वय ५४) यांनी ९ ऑगस्ट २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आपल्या मुलाची हत्या सरोज चिकुंद्रे (रा. एंकोडी रोड, उमरगा), रेणु पवार आणि निता जाधव (दोघीही रा. डिग्गी रोड, उमरगा) यांनी संगनमत करून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तिघीही सध्या येरमाळा येथील कालिका माता केंद्रात वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
वडिलांच्या तक्रारीवरून, उमरगा पोलिसांनी तिन्ही आरोपी महिलांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(३) (खून) आणि ३(५) (कट रचणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रेमप्रकरण की अन्य कोणत्या वादातून ही हत्या झाली, याचा पोलीस शोध घेत असून, या घटनेमुळे उमरगा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.