धाराशिव: शहरात कायदा व सुव्यवस्थेचा धाकच उरला नाही की काय, असा प्रश्न पडावा अशी घटना धाराशिवमध्ये घडली आहे. एका मद्यधुंद व्यक्तीने चक्क धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या आवारातच गोंधळ घालून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. आरडाओरड करत या व्यक्तीने काच फोडून धिंगाणा घातला. ही घटना शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री घडली.
प्रदीप श्रीमंत लोखंडे (वय ४२, रा. तुळजापूर नाका, धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रदीप लोखंडे हा दारूच्या नशेत धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात आला. येथे त्याने आरडाओरड करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून पोलीस कर्मचारी बाहेर आले, तेव्हा तो आवारातील काच फोडून नुकसान करत असल्याचे दिसले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. आरोपी प्रदीप लोखंडे याच्यावर मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेट पोलीस ठाण्यातच घडलेल्या या प्रकारामुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.




