धाराशिव – धाराशिव तालुक्यातील येडशी येथील प्रसिद्ध रामलिंग मंदिराच्या परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर धाराशिव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ‘अडी/टायगर मटका’ नावाचा जुगार खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई सोमवारी (दि. ११) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. धाराशिव ग्रामीण पोलिसांना येडशी येथील रामलिंग मंदिराच्या पाठीमागे काही व्यक्ती मटका जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.
यावेळी आकाश उदय शिंदे (वय २६), स्वप्नील रामेश्वर सुतकर (वय २०), आशुतोष नितीन शिंदे (वय २२) आणि प्रशांत विलास होवाळे (वय २६, सर्व रा. रामलिंगनगर, येडशी) हे मटका जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. पोलिसांच्या पथकाने त्यांच्या ताब्यातून रोख ५,६०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.
याप्रकरणी, पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांवर वचक बसण्यास मदत होणार असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.