धाराशिव : जागतिक युवा दिनाचे निमित्त साधून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविण्याचा ‘महान’ निर्धार जाहीर केला आहे. महाविद्यालयांमध्ये अँटी-नार्कोटिक्स क्लब, पालकांचा सहभाग, पथनाट्ये आणि गोपनीय तक्रारींसाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक देण्याच्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. पण, आमदारांची ही घोषणा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत की काय, अशी शंका जिल्हाभरातील जनतेला पडली आहे. कारण ज्यांच्यावर ड्रग्ज आणि मटका किंग असल्याचा आरोप आहे, त्याच व्यक्तीच्या हस्ते काही दिवसापूर्वी तुळजापुरात मंत्र्यांचा सत्कार स्वीकारताना आणि त्याचे जाहीर कौतुक करताना आमदार महाशय आघाडीवर होते.
देखावा एक, वास्तव दुसरे!
एकीकडे आमदार पाटील हे तुळजापूर ड्रग्जमुक्त झाल्याचा दावा करत आहेत आणि याच “यशस्वी” मॉडेलवर संपूर्ण जिल्हा ड्रग्जमुक्त करण्याची गर्जना करत आहेत. युवकांना सजग राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत. ही सगळी धूळफेक म्हणजे जनतेच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे.
कारण दुसरीकडे, याच आमदार महोदयांनी तुळजापुरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात, ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि ‘मटका किंग’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या विनोद गंगणे याला व्यासपीठावर मानाचे स्थान दिले होते. राज्याच्या महसूल मंत्र्यांचा सत्कार गंगणेच्या हस्ते झाला आणि आमदार राणा पाटील यांनी हे सर्व हसतमुखाने पाहिले. इतकेच नव्हे, तर गंगणे आणि आमदार राणा पाटील यांचे ‘खास संबंध’ सर्वश्रुत असून, त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर गंगणेचे नाव ठळकपणे झळकत होते.
जनतेचे सवाल:
- ज्यांच्यावर तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या ड्रग्ज विक्रीचा आरोप आहे, त्यालाच व्यासपीठावर बसवून सत्कार करणारे आमदार, कोणत्या तोंडाने ड्रग्जविरोधी मोहिमेचे नेतृत्व करणार?
- ही ड्रग्जविरोधी मोहीम म्हणजे केवळ जुन्या पापांवर पांघरूण घालण्याचा आणि स्वतःची प्रतिमा स्वच्छ करण्याचा एक राजकीय स्टंट आहे का?
- आमदारांचे खरे सहकार्य कोणाला आहे? जिल्ह्याच्या तरुणांना की त्यांना व्यसनाच्या खाईत ढकलणाऱ्या माफियांना?
- ज्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री देखील फिरकत नाहीत, त्या कार्यक्रमात ड्रग्ज आरोपीला मानाचे स्थान देणाऱ्या आमदारांच्या ‘गोपनीय’ हेल्पलाइनवर कोण विश्वास ठेवणार?
एकीकडे ड्रग्जमुक्तीचा देखावा आणि दुसरीकडे ड्रग्ज माफियांना राजाश्रय, हा दुतोंडी कारभार जनता आता ओळखून आहे. त्यामुळे आमदारांच्या या ‘निर्धारा’वर विश्वास ठेवण्याऐवजी, त्यांच्या मूळ हेतूवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही मोहीम खरोखरच तरुणांच्या भल्यासाठी आहे की माफियांच्या सोयीसाठी, हे काळच ठरवेल.