भूम – तालुक्यातील सुकटा येथे व्याजाने घेतलेले पैसे परत करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ३६ वर्षीय व्यक्तीची दगडाने मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बालाजी जयराम भायगुडे असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत बालाजी भायगुडे (वय ३६, रा. भवानवाडी, सुकटा, ता. भूम ) यांनी आरोपी जोशी बबरु काळे, राधा जोशी काळे आणि तुषार जोशी काळे (सर्व रा. सुकटा, ता. भुम) यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. याच पैशांच्या परतफेडीवरून त्यांच्यात वाद सुरू होता.
घटनेच्या दिवशी, म्हणजेच ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अंदाजे साडेनऊ वाजता, आरोपींनी बालाजी भायगुडे यांच्या घरात घुसून त्यांना दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने बालाजी यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मयताची पत्नी सोनाली बालाजी भायगुडे (वय ३३) यांनी १२ ऑगस्ट रोजी भूम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जोशी बबरु काळे, राधा जोशी काळे आणि तुषार जोशी काळे या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३३३ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.