धाराशिव: तालुक्यातील करजखेडा येथे जमिनीच्या वादातून एकाने पती-पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज, बुधवार, दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. सहदेव पवार आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सहदेव पवार आणि आरोपी जीवन हरिबा चव्हाण यांची करजखेडा येथे शेजारी शेती आहे. पवार यांच्याकडे ३६ एकर तर चव्हाण यांच्याकडे २ एकर जमीन आहे. या दोघांमध्ये जमिनीवरून गेल्या काही काळापासून तीव्र वाद सुरू होता.
काही वर्षांपूर्वी आरोपी जीवन चव्हाण याला सहदेव पवार यांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने पवार यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती, मात्र उच्च न्यायालयातून ते जामिनावर बाहेर होते. तेव्हापासून जीवन चव्हाण याच्या मनात राग होता.
याच रागातून आज, बुधवारी दुपारी आरोपी जीवन चव्हाण याने सहदेव पवार आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार यांच्यावर हल्ला केला. त्याने दोघांनाही करंजखेडा-पाटोदा रस्त्यावर गाडीने उडवले आणि त्यानंतर कोयत्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे करजखेडा गावावर शोककळा पसरली आहे.