लोहारा : तालुक्यातील जेवळी येथे विशेष ग्रामसभेचे कामकाज पाहणाऱ्या एका ग्रामपंचायत अधिकाऱ्यास शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीमंत धोंडीराम जगदाळे (वय ५३, रा. लातूर), जेवळी (उत्तर) येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जेवळी येथील महिला केंद्रामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. जगदाळे हे सभेचे कामकाज सांभाळत असताना, गावातील सहा जणांनी संगनमत करून गोंधळ घातला.
आरोपी शामसुंदर शिवबसाप्पा तोरकडे, योगीराज भोजाप्पा कारभारी, दयानंद बाबुराव तोरकडे, समर्थ ज्ञानेश्वर कारभारी, शिवानंद श्यामसुंदर तोरकडे, आणि ज्ञानेश्वर मल्लीनाथ कारभारी (सर्व रा. जेवळी उत्तर, ता. लोहारा) यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यांनी फिर्यादी जगदाळे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर श्रीमंत जगदाळे यांनी लोहारा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहाही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १२१(१), १८९(२), १९१(२), १९०, ३५२, आणि ३५१(२)(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.