धाराशिव – तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार कामावरून सुरू असलेला वाद आता नव्या वळणावर पोहोचला असून, महायुतीमधील अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधानंतर आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मागणीनंतर, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी अखेर मुंबईत एका बैठकीचे आयोजन केले आहे. मात्र, या बैठकीच्या निमंत्रणावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. बैठकीला पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि स्थानिक खासदार यांना डावलण्यात आले असून, केवळ आमदार राणा पाटील, जिल्हाधिकारी आणि पुजारी यांनाच निमंत्रित करण्यात आले आहे.
नेमके काय घडले?
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजापूर येथे दौरा करून मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला विरोध दर्शवत गोंधळ घातला होता. यानंतर, स्थानिक आमदार राणा पाटील यांनी तातडीने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना पत्र लिहून या “षडयंत्राची” चौकशी करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती.त्या मागणीची दखल घेत मंत्री शेलार यांनी मुंबईत येत्या १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता मंत्र्यालयातील दालन क्रमांक ४०१ मध्ये बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीच्या निमंत्रितांच्या यादीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पालकमंत्री आणि खासदारांना वगळले, वादाची नवी ठिणगी
आशिष शेलार यांनी बोलावलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विकास आराखडा समितीचे अध्यक्ष असलेले प्रताप सरनाईक यांनाच निमंत्रण देण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे, तर स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर आणि विरोधी पक्षाच्या इतर आमदारांनाही या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले आहे. केवळ आमदार राणा पाटील, धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि मंदिर पुजारी मंडळाचे प्रतिनिधी यांनाच बोलावण्यात आले आहे.
एका जिल्ह्याच्या विकासाच्या आणि अत्यंत संवेदनशील धार्मिक विषयावरील बैठकीतून थेट पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींना वगळण्याच्या या निर्णयामुळे महायुतीमधील अंतर्गत शीतयुद्ध आता उघड झाले आहे. आमदार राणा पाटील यांची मागणी तात्काळ मान्य करून, त्यांचे संभाव्य विरोधक मानल्या जाणाऱ्या पालकमंत्री सरनाईक यांनाच बैठकीतून वगळल्याने, या प्रकरणात राणा पाटील यांना झुकते माप दिले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या निर्णयामुळे तुळजापूरचा विकास वाद आता मुंबईत अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

