ढोकी : ढोकी-गोवर्धनवाडी रस्त्यालगत ठेवलेले लाखो रुपये किमतीचे इलेक्ट्रिक कंडक्टर केबल आणि अर्थिंग रॉड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत चोरट्यांनी तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचा माल लंपास केला असून, एक लाख रुपयांच्या मालाचे नुकसानही केले आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मदन राजेंद्र कांबळे (वय ३४, रा. कावळेवाडी, ता. जि. धाराशिव) हे व्यवसायाने गुत्तेदार आहेत. त्यांनी आपल्या कामासाठी लागणारे साहित्य ढोकी-गोवर्धनवाडी रस्त्यावरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ ठेवले होते. शनिवार, दि. १६ ऑगस्टच्या रात्री १० ते रविवार, दि. १७ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी याठिकाणी डल्ला मारला.
चोरट्यांनी ५५ एमएम एसी रॅबिट कंडक्टरच्या दोन ड्रमपैकी एका ड्रममधील ६.२०० किलोमीटर आणि दुसऱ्या ड्रममधील ३ किलोमीटर लांबीची तार चोरून नेली. यासोबतच २० अर्थिंग रॉडही त्यांनी लंपास केले. या चोरलेल्या मालाची एकूण किंमत ३ लाख ६० हजार रुपये आहे. इतकेच नाही, तर दुसऱ्या ड्रममधील उर्वरित कंडक्टर केबल कटरने तोडून चोरट्यांनी तब्बल १ लाख रुपयांचे अतिरिक्त नुकसान केले आहे.
या घटनेनंतर कंत्राटदार मदन कांबळे यांनी रविवारी ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३२४(४), (५) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.