कळंब – सणासुदीच्या काळात डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाला आपण सरावलो असतो, पण आज शिराढोणच्या रस्त्यांवर एक वेगळाच आवाज घुमला. हा आवाज डीजेच्या दणदणाटाचा नव्हता, तर हा आवाज होता लहान मुलांच्या निरागस पण ठाम निर्धाराचा – “आम्हाला DJ नको!”. खाकी वर्दीतील पोलीस आणि शाळेच्या गणवेशातील शेकडो विद्यार्थी जेव्हा एकत्र येऊन शांततेसाठी रस्त्यावर उतरले, तेव्हा सारा गाव क्षणभर थांबून हे दृश्य पाहत होता.
शिराढोण पोलीस स्टेशन आणि गावातील पी.एम.श्री., जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व के.एन.विद्यालय यांनी मिळून या अनोख्या जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीत सहभागी झालेल्या लहान मुलांच्या हातातील फलकांनी आणि त्यांच्या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “ध्वनी प्रदूषण म्हणजे हृदयाचा खून”, “तुमचा DJ, सामन्याची डोकेदुखी”, “कान फुटण्याआधी आवाज थांबवा” अशा एक ना अनेक घोषणा देत ही चिमुकली फौज संपूर्ण गावात फिरली.
या मुलांचा उत्साह आणि त्यांच्या मागण्यांमधील गांभीर्य पाहून गावातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकही विचारात पडले. ‘सण साजरा करा, पण दुसऱ्याला त्रास देऊन नको,’ हा संदेश या मुलांनी अत्यंत प्रभावीपणे दिला. ही केवळ एक सरकारी रॅली नव्हती, तर येणाऱ्या पिढीने आजच्या पिढीला दिलेली एक भावनिक साद होती. “आमचे आरोग्य हिरावू नका,” असे जेव्हा लहान मुले कळकळीने सांगतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य होते.
या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे. येत्या गणेशोत्सवात आणि इतर सणांमध्ये गावातील तरुण मंडळे या लहानग्यांच्या हाकेला प्रतिसाद देतील आणि ‘DJ मुक्त’ सण साजरे करून एक नवा आदर्श निर्माण करतील, अशी आशा आता व्यक्त केली जात आहे. पोलीस विभागानेही कायद्याचे पालन करून ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे.
एकंदरीत, शिराढोणमधील ही रॅली केवळ एक कार्यक्रम न राहता, मोठ्या आवाजाच्या संस्कृतीला दिलेला एक संवेदनशील आणि शक्तिशाली संदेश ठरली आहे. आज शिराढोणच्या मुलांनी मोठ्यांना शहाणपणाचा एक मोठा धडा दिला आहे, हे नक्की!