तुळजापूर: एका खांद्यावर शाळेचे दप्तर आणि दुसऱ्या खांद्यावर भविष्याची स्वप्ने पाहणारा विद्यार्थी… पण पायाखाली मात्र जीवघेणा प्रवाह. हे हृदय पिळवटून टाकणारे चित्र आहे तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावातील. येथे बोरी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी गावकऱ्यांना अक्षरशः मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बोरी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे गावातील मुख्य पूल पाण्याखाली गेला असून, विद्यार्थी, शेतकरी आणि इतर वाहनधारकांचा संपर्क तुटला आहे. मात्र, पोटापाण्यासाठी आणि शिक्षणासाठी गावकऱ्यांना या धोकादायक पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. लहान मुलांना कडेवर घेऊन पालक हा जीवघेणा पूल ओलांडत आहेत, तर शेतकरी आपला शेतमाल आणि जनावरे घेऊन याच पाण्यातून प्रवास करत आहेत.
विशेष म्हणजे, हा गावकऱ्यांच्या नशिबी आलेला त्रास आजचा नाही. गेली पाच ते सहा वर्षे, या पुलाची उंची वाढवण्यासाठी गावकरी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. अनेकदा निवेदने दिली, मागण्या केल्या, पण प्रशासनाच्या कानावर अजूनही पाणी पोहोचलेले नाही. “एखादा अपघात झाल्यावरच सरकारला जाग येणार का?” असा संतप्त सवाल गावकरी करत आहेत.
प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे बारूळ गावातील नागरिकांचा प्रत्येक दिवस भीतीच्या छायेत जात आहे. आतातरी संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन पुलाच्या उंचीचे काम तातडीने सुरू करावे, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.