परंडा : बसमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान गंभीर मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना परंडा येथे घडली आहे. या मारहाणीत एका प्रवाशाच्या डोळ्याची नस तुटली असून, याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा नामदेव त्रिंबके (वय ५७, रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हे दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडीहून परंड्याकडे येणाऱ्या बसमधून प्रवास करत होते. परंडा शहराच्या जवळ आल्यावर, बसमधील जागेवरून आरोपी प्रशांत आप्पा गरड (रा. कात्राबाद, ता. परंडा) याच्यासोबत त्यांचा वाद झाला.
हा वाद विकोपाला जाऊन आरोपी गरड याने त्रिंबके यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने त्रिंबके यांच्या डोळ्यावर जोरात बुक्की मारल्याने त्यांचा चष्मा फुटला. फुटलेल्या चष्म्याची काच डोळ्यात घुसल्याने त्रिंबके यांच्या डोळ्याची नस तुटली व ते गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर कृष्णा त्रिंबके यांनी सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) परंडा पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रशांत गरड याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११७(२), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.