धाराशिव : धाराशिव शहर आणि ग्रामीण भागात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एका घटनेत शहरात बंद घराचे कुलूप तोडून १५ हजार रुपयांची रोकड चोरण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत ग्रामीण भागातील पोहनेर शिवारातून शेतकऱ्यांच्या तब्बल ६५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पानबुड्या (सबमर्सिबल पंप) आणि केबलची चोरी झाली आहे. या दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात दिवसाढवळ्या घरफोडी, १५ हजारांची रोकड लंपास
पहिली घटना धाराशिव शहरातील भवानी चौक, गणेश नगर परिसरात घडली. येथील रहिवासी नवनाथ पांडुरंग घोडके (वय ५४) यांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेली १५,००० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी नवनाथ घोडके यांनी सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांना फटका, ६५ हजारांच्या पानबुड्या चोरीला
चोरीची दुसरी घटना धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहनेर शिवारात घडली. किसन शिवाजीराव देशमुख (वय ६५, रा. पोहनेर) आणि इतर शेतकऱ्यांच्या विहिरींवरील पानबुड्या आणि केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना १५ ऑगस्टच्या रात्री साडेसात ते १६ ऑगस्टच्या सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी किसन देशमुख, बाळासाहेब देशमुख, विलास देशमुख आणि प्रकाश देशमुख यांच्या मालकीच्या एकूण ६ वेगवेगळ्या कंपन्यांच्या पानबुड्या आणि संबंधित केबल चोरल्या. या चोरी झालेल्या मालाची एकूण किंमत ६५,८५० रुपये इतकी आहे. याप्रकरणी किसन देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.