मागील भागात आपण पाहिले: आठ कोटींच्या ‘वॉटर पार्क’मुळे पिंट्याची चांगलीच ‘वाट’ लागली होती. त्यात दारुड्या शेतकऱ्याच्या व्हिडिओने डॅमेज कंट्रोलचाही ‘ड’ निघाला होता. आता पिंट्याच्या अडचणींची कुंडली उघडण्याची वेळ आली आहे…
फेसबुक पिंट्या, हे नाव आता धाराशिवच्या राजकीय वर्तुळात एक विनोदी ‘हास्यस्फोट’ बनले आहे. त्यांची राजकीय एंट्री म्हणजे ‘वडिलांच्या पुण्याई’चा उत्तम नमुना! जसा एखादा विद्यार्थी वडिलांच्या ओळखपत्रावर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवतो, त्याच थाटात पिंट्या राजकारणात आले. आणि यात मदत केली खुद्द बारामतीकर साहेबांनी! साहेबांनी पिंट्याला इतकी ‘लाभाची’ पदं दिली की, पिंट्याच्या कार्यकर्त्यांना वाटे, ‘लाभ’ याचंच दुसरं नाव पिंट्या असावं.
पण म्हणतात ना, ‘उपकार कर्त्याला विसरणे हा माणसाचा धर्म आहे.’ पिंट्यानेही तो चोखपणे पाळला. ‘विकास’ करायचा आहे, हे गोंडस कारण पुढे करत, बारामतीकर साहेबांना ‘जय महाराष्ट्र’ करत पिंट्याने दुसऱ्या पक्षात उडी मारली. स्वप्न होतं मंत्रीपदाचं! त्यासाठी तुळजाभवानी मातेला नवस केला, तिच्या नावावर मोठमोठे ‘इव्हेंट’ आयोजित केले. पण आई भवानी बहुतेक पिंट्याच्या ‘पक्षांतरा’मुळे नाराज झाल्या असाव्यात. प्रसन्न व्हायच्या ऐवजी त्या अधिकच ‘कोपल्या’ आहेत.
आठ कोटी खर्चून बांधलेले गळके बस स्थानक म्हणजे आईच्या भक्तांच्या शिव्यांची ‘टिपिकल’ उदाहरण! त्यात शिखर पाडण्याची इच्छा बोलून दाखवल्यापासून तर आई आणखीनच ‘लाल डोळे’ करून बघत आहे. पिंट्याचे सगळे राजकीय ‘पत्ते’ सध्या ‘उलटे’ पडले आहेत. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावरून तर असं काही रान पेटलंय की, विचारू नका!
आता पाहूया, फेसबुक पिंट्याच्या अडचणीमागची ‘अंतरंग’ कारणं:
१. ‘संगत’चा रंग: पिंट्याची उठबस हल्ली कुणासोबत असते? तर पिटू ‘ड्रग्ज माफिया’ आणि मन्या ‘मटका किंग’! या दोघांना जवळ केल्यामुळे पिंट्याची इमेज ‘उजळ’ झाली आहे, हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नाही. पिटूच्या हस्ते सत्कार स्वीकारणे असो, किंवा मुंबईच्या बैठकीत मन्याला मानाचे पान देणे असो, पिंट्याने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही, तर थेट ‘बुल्डोजर’ चालवला आहे.
२. ‘थिंक टँक’ नव्हे, ‘ब्लंडर बँक’! पिंट्याच्या आजूबाजूला एक ‘थिंक टँक’ मंडळ आहे म्हणे! या मंडळात कोण कोण आहेत?
* कवी कंदीलकर: हे पडद्यामागचे ‘लेखक’ आणि ‘सल्लागार’. पिंट्याच्या बातम्या लिहिण्यापासून ते त्याला काय बोलायचं, हे ठरवण्यापर्यंत यांचा ‘मोलाचा’ वाटा असतो. (म्हणजे पिंट्याच्या डोक्यात जे नसतं, ते हे भरवतात!)
* प्रसिद्धी प्रमुख ढोकीकर: यांचा एकच धंदा – दिवसरात्र फेसबुक पिंट्याचा ‘उदो उदो’ करणे! हे पिंट्याचे ‘पगारी भाट’ आहेत, जे लाईक आणि कमेंट्सच्या बदल्यात काहीही लिहायला तयार असतात.
* अर्थतन्य तेरकर: हे पिंट्याच्या ‘अर्थ’पूर्ण योजनांचा हिशोब ठेवतात. (किती आले, किती गेले आणि कुठे ‘वळवले’, याचा तपशील यांच्याकडे असतो!)
* धाराशिव झिरो: हे मंडळ बातम्यांना ‘तिखट मीठ’ लावून व्हायरल करण्यात माहिर आहे. (अफवा आणि खोट्या बातम्या पसरवण्यात यांचा हातखंडा!)
* खबरीलाल गारेगार: यांचे काम पिंट्याची इमेज बिल्डिंग तयार करणे आहे. यासाठी ते स्थानिक युट्यूब चॅनेलवाल्यांना (ज्यांचे सबस्क्रायबर एक-दोन हजार असून स्वतःला मुख्य संपादक समजतात) ५०० ते २००० रुपये पाठवून पिंट्याच्या ‘पेड’ बातम्या प्रसिद्ध करतात आणि विकासाचा डंका पिटतात.
* वीरपुरुष मदनलाल: हे पिंट्याचे ‘गुप्तहेर’ आहेत. विरोधी गोटात काय शिजत आहे, कोण काय बोलत आहे, याची खडा न् खडा माहिती गोळा करून पिंट्यापर्यंत पोहोचवणे हे यांचे मुख्य काम. (पण अनेकदा हे चुकीची माहिती देऊन पिंट्याला आणखी अडचणीत आणतात!)
ही 'ब्लंडर बँक' २४ तास पिंट्याला 'यशस्वी' करण्यासाठी झटत असते! (खरं तर त्याला आणखी खाली खेचण्यासाठी!)
३. ‘सहानुभूती’चा ओव्हरडोस: गोपाळकालाच्या दिवशी पिंट्याच्या जन्मभूमीत एक जवान शहीद झाला. पण पिंट्याला त्याबद्दल ‘थोडेही’ दुःख झाले नाही. उलट, त्याच दिवशी धाराशिवमध्ये रस्ता ब्लॉक करून, जेसीबीमधून स्वतःवर फुलं उधळून पिंट्याने ‘शौर्या’चा आणि ‘सहानुभूती’चा कळस गाठला!
एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त होता, होत्याचे नव्हते झाले होते, आणि दुसरीकडे पिंट्या आपल्याच धुंदीत ‘जल्लोष’ साजरा करत होता. याला म्हणतात ‘गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली!’
आता पिंट्याला नक्की काय करायचंय, हे खुद्द पिंट्यालाही माहीत नाही. सगळे ‘प्लान’ हवेत विरघळत चालले आहेत आणि आई भवानीचा ‘कोप’ वाढतच चालला आहे.
पुढील भागात पाहूया, या ‘उधार’च्या पुण्याईवर चालणाऱ्या राजकारण्याचं काय होतं…
- बोरूबहाद्दर