धाराशिव: “साहेब, तुम्ही झोपला असाल तर खुशाल झोपा, पण आमच्या मुलांच्या भविष्याचा बळी देऊ नका!” अशाच काहीशा भावना व्यक्त करत आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनासमोर चक्क “झोपा काढा” आंदोलन केले. प्रशासकीय उदासीनतेच्या विरोधात केलेला हा अभिनव निषेध सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
एकीकडे जिल्ह्यात ना शेतीला भाव, ना तरुणांच्या हाताला काम. अशा बिकट परिस्थितीत शिक्षणाच्या जिवावर इथला तरुण बाहेरच्या राज्यात जाऊन नाव कमावतोय. जिल्ह्याच्या प्रगतीचा एकमेव राजमार्ग शिक्षण असताना, त्याच शिक्षणाचे मंदिर असलेल्या सरकारी शाळांची अवस्था मात्र भयाण आहे. याच झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ‘आप’ने गांधीगिरीचा मार्ग अवलंबत थेट कार्यालयासमोरच प्रतिकात्मक झोपा काढल्या.
आम आदमी पार्टीने केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले. शहरातील अनेक सरकारी शाळांमध्ये ना मुलींसाठी धड शौचालय, ना पिण्यासाठी स्वच्छ पाणी. खेळाच्या मैदानाअभावी मुलांचे बालपण कोमेजले असून, धोकादायक बनलेल्या इमारती मृत्यूलाच आमंत्रण देत आहेत. या गंभीर बाबींकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन ढिम्मच राहिल्याने ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे हे अनोखे शस्त्र उपसले.
जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे, जिल्हा सचिव मेहबूब शेख, आणि जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. जोरदार घोषणाबाजी करत, त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला. “जर तुम्ही जागेपणी काही करू शकत नसाल, तर निदान शांत झोप तरी घ्या, आम्ही तुम्हाला जागे करण्याचा प्रयत्न करतो,” असा टोला लगावत हे आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनानंतर ‘आप’च्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन नगरपालिकेला सादर केले. या आंदोलनाने प्रशासनाचे डोळे उघडणार की ते आपली झोप सुरूच ठेवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.