परंडा – लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी परंडा तालुक्यातील आवारपिंपरी येथील एका २० वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई परंडा पोलिसांनी बुधवारी, २० ऑगस्ट रोजी रात्री केली.
आविष्कार आजिनाथ गुडे (वय २०, रा. आवारपिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी आविष्कार गुडे हा आवारपिंपरी गावात विनापरवाना लोखंडी कोयता स्वतःजवळ बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या आणि त्याच्या कृतीमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
या माहितीवरून परंडा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे १०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार फिरोज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आविष्कार गुडे याच्या विरोधात परंडा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.