धाराशिव: सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी, २० ऑगस्ट रोजी कळंब आणि लोहारा तालुक्यात अशा प्रकारे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कळंब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन बब्रुवान शेळके (वय ३०, रा. शेळका धानोरा) याने दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील पॅजिओ ॲपे (क्र. एमएच २५ पी ७७३) हा होळकर चौक ते तांदुळवाडी जाणाऱ्या रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल अशा स्थितीत उभा केला होता.
तर दुसऱ्या घटनेत, लोहारा पोलिसांनी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. आरोपी अशोक मारुतीराव आदटराव (वय ५४, रा. करजखेडा) याने आपला छोटा हत्ती टेम्पो (क्र. एमएच १३ जीएन ३६२८) लोहारा ते जेवळी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरीत्या उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता.
या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. रस्त्यावर अशा बेजबाबदारपणे वाहने उभी केल्याने अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.