धाराशिव :करजखेडा येथील शेतकरी सहदेव पवार आणि त्यांच्या पत्नी प्रियंका पवार यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी त्यांच्या दोन अनाथ मुलींनी आणि नातेवाईकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. “आमच्या मम्मी-पप्पांना न्याय मिळवून द्या,” असा या चिमुकल्यांनी फोडलेला हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा उपस्थितांचे काळीज कुरतडणारा होता. या आंदोलनाला १८ ग्रामपंचायती आणि स्वराज्य संघटनेने ठराव करून पाठिंबा दर्शवला आहे.
काय आहे प्रकरण?
धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथील सहदेव पवार व त्यांची पत्नी प्रियंका हे १३ ऑगस्ट रोजी मोटारसायकलवरून शेतीसाठी औषधे खरेदी करण्यास जात होते. गावातील चौकातच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्या मोटारसायकलला चारचाकी गाडीने धडक दिली. त्यानंतर हरिबा यशवंत चव्हाण आणि जीवन हरिबा चव्हाण यांनी धारदार कोयत्याने दोघांवर सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियंका पवार यांचे शीर धडावेगळे करण्यात आले, तर सहदेव यांच्यावरही अनेक वार करून त्यांना जागीच ठार करण्यात आले.
आरोपींना अटक करण्याची मागणी
या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली असली तरी, या हत्येच्या कटात सहभागी असलेले आणि पवार दाम्पत्याची माहिती हल्लेखोरांना देणारे इतर आरोपी अद्याप मोकाट आहेत, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर ‘मकोका’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
न्यायासाठी आक्रोश आणि पाठिंबा
आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहदेव आणि प्रियंका यांच्या मुली आराध्या व संजना यांनी आपल्या नातेवाईकांसह आक्रोश केला. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या मुलींचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १८ ग्रामपंचायतींनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबतचा ठराव मंजूर केला आहे. तसेच, स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांनीही संघटनेच्या वतीने असाच ठराव सादर करून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.