मागील भागात आपण पाहिले: पिंट्याच्या ‘विकास यात्रे’चा खरा शेवट धाराशिवमध्ये नव्हे, तर नेरुळमध्ये कसा होतो, हे आपण पाहिले. आता पाहूया, त्याच विकासाचे नवे ‘बुडबुडे’!
राजकारणात दोन प्रकारचे नेते असतात. एक जे काम करतात आणि दुसरे जे कामाच्या ‘गप्पा’ मारतात. फेसबुक पिंट्या हा दुसऱ्या प्रकारातला ‘PhD धारक’ होता. गेली २० वर्षे धाराशिवच्या जनतेला विकासाची स्वप्ने दाखवून झाल्यावर, आता जनतेला नवीन स्वप्ने दाखवण्यासाठी पिंट्याकडे काहीच उरले नव्हते. म्हणून त्याने जुनीच आश्वासने नव्या आकर्षक पॅकिंगमध्ये विकायला काढली.
काल पत्रकार परिषद घेऊन पिंट्याने तब्बल ३२ आश्वासनांचे रंगीबेरंगी ‘बुडबुडे’ हवेत सोडले. प्रत्येक बुडबुडा दिसायला सुंदर होता, पण त्याला हात लावताच तो ‘फुस्स’ होणार, हे आता लोकांना कळून चुकले होते.
यातील सर्वात मोठा आणि आकर्षक बुडबुडा होता – येडशी अभयारण्यात जंगल सफारी! “मी इथे १५ किलोमीटरचा ट्रॅक बनवणार, पर्यटक येतील, रोजगार वाढेल,” पिंट्या सांगत होता. गंमत म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी याच जागेवर ‘मिनी माथेरान’ सुरू करण्याचे ‘फोटोशॉप’ केलेले स्वप्न पिंट्याने विकले होते. आता ते ‘मिनी माथेरान’ थंड बस्त्यात गुंडाळून ‘जंगल सफारी’चा नवा घाट घातला जात होता. जणू काही विकासाचा नाही, तर ‘ड्रीम प्रोजेक्ट’ बदलण्याचाच हा कार्यक्रम होता.
एका धाडसी पत्रकाराने प्रश्न विचारला, “साहेब, ही जागा वन विभाग आणि रेल्वेची आहे. त्यांची परवानगी मिळाली का? डिसेंबर अखेरपर्यंत १५ किलोमीटरचा ट्रॅक कसा बनेल?”
पिंट्याने हसून उत्तर दिले, “अहो, परवानगी म्हणजे काय? आपण फेसबुकवर एक पोल घेऊ. जनतेचा कौल आला की झालं!”
“आणि साहेब, मागच्या वर्षी तुम्ही कृष्णा खोऱ्यातलं ७ टीएमसी पाणी आणणार म्हणून उद्घाटन केलं होतं, त्याचं काय झालं?” दुसरा प्रश्न.
“ते पाणी… अहो, ते पाईपलाईनमध्ये जरा ट्रॅफिक जॅम झालाय. पण लवकरच येईल. तोपर्यंत आपण जंगल सफारीचा आनंद घेऊया,” पिंट्याने उत्तर दिले.
पण या नव्या ‘बुडबुड्यां’मागे एक मोठे कारण होते!
झाले असे की, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल सहा हजार बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप ‘शिवसेनेच्या वाघाने’ केला होता. या वाघाने अशी काही डरकाळी फोडली की, पिंट्याच्या ‘सिंहासनाला’ हादरे बसू लागले. आता या गंभीर आरोपावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे कसे वळवायचे? पिंट्याच्या ‘ब्लंडर बँके’ने त्याला आयडिया दिली – ‘चला पत्रकारांना जंगलात फिरवून आणूया!’
आणि त्यानुसार, दुसऱ्याच दिवशी पिंट्याने निवडक पत्रकारांना (अर्थात, खबरीलाल गारेगारसारख्या ‘पेड’ पत्रकारांना) घेऊन येडशी अभयारण्यात ‘जंगल सफारी’ आयोजित केली. पिंट्याने सफारीची टोपी, जॅकेट घालून असा काही ‘लूक’ केला होता, जणू तो ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’च्या शूटिंगला आला होता.
जीपमधून फिरताना पिंट्या प्रत्येक झाडाकडे बोट दाखवून सांगत होता, “हे बघा, माझ्यामुळेच हे झाड इतके उंच वाढले आहे.” पत्रकारांना मात्र यात काहीच रस नव्हता. त्यांना खरा वाघ बघायचा होता.
“साहेब, वाघ दिसेल का?” एकाने विचारले.
पिंट्या छाती फुगवून म्हणाला, “अरे, हा अख्खा जंगलच माझा आहे. इथला खरा वाघ तर मीच आहे! तो शिवसेनेचा वाघ तर डरकाळी फोडून बिळात लपला, बघा आज आलाच नाही सफारीला!”
पिंट्याचा हा विनोद चालू असतानाच, जीप चालवणाऱ्या वनरक्षकाच्या मोबाईलवर एक मेसेज आला. एका गाववाल्याने पाठवला होता – “साहेब, जपून! टिपेश्वरहून आलेला वाघ काल रात्रीच दोन गायी घेऊन गेलाय. लय भुकेला हाय!”
वनरक्षकाच्या चेहऱ्यावरचा घाम पिंट्याला दिसला नाही, कारण तो फेसबुक लाईव्ह करण्यात व्यस्त होता.
थोडक्यात, ज्या जंगलात जायला गावकरी घाबरत होते, त्याच जंगलात पिंट्या पत्रकारांना ‘विकासाची सफारी’ घडवत होता. बोगस मतदारांचा वाघ शहरात डरकाळी फोडत होता आणि खरा वाघ जंगलात दबा धरून बसला होता.
पिंट्या मात्र आपल्याच धुंदीत होता. त्याला वाटत होते, आपण लोकांना अजूनही वेड्यात काढू शकतो. पण त्याला हे माहीत नव्हते की, लोक आता त्याचे ‘बुडबुडे’ फोडायला शिकले होते.
विचार करा, याला विकासाचा ध्यास म्हणायचा की निव्वळ ‘थापां’चा खेळ?
पुढील भागात भेटूया…
-बोरूबहाद्दर