सत्तेचा माज आणि पैशाचा उन्माद जेव्हा डोक्यात जातो, तेव्हा आरशात दिसणारा स्वतःचा खरा चेहरासुद्धा सहन होत नाही. मग दोष आरशाला दिला जातो, तो फोडून टाकण्याची भाषा केली जाते. धाराशिवच्या राजकारणात सध्या काहीसा असाच प्रकार सुरू आहे. गेली ३५ वर्षे पत्रकारितेत राहून आणि १४ वर्षे ‘धाराशिव लाइव्ह’च्या माध्यमातून निर्भीडपणे लोकांचा आवाज बुलंद करणाऱ्यांवर आज ‘अनधिकृत’ आणि ‘सुपारीबाज’ म्हणून चिखलफेक केली जात आहे. पण लक्षात ठेवा, हा आवाज जनतेचा आहे; तो दडपशाहीने बंद होत नसतो.
आमची लढाई व्यक्तीविरोधात नाही, तर त्या प्रवृत्तीविरोधात आहे जी जनतेच्या पैशावर डल्ला मारते आणि प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. जेव्हा तुळजापूरचे बस स्थानक आठ कोटी रुपये खर्चूनही गळके राहते, तेव्हा आम्ही गप्प बसायचे? जेव्हा आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट होतो, तेव्हा हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून शांत राहायचे? देवीच्या दर्शन पासचा काळाबाजार होत असताना डोळेझाक करायची? आणि भवानी मातेची तलवार कुणाच्या तरी खासगी मठात नेऊन ठेवली जाते, त्या मठाला ‘प्रति तुळजाभवानी’ बनवण्याचा घाट घातला जातो, तेव्हा तुळजापूरकरांच्या अस्मितेसाठी आम्ही बोलायचे नाही तर कोणी बोलायचे?
हे प्रश्न विचारले की सत्ताधाऱ्यांच्या आणि त्यांच्या चेलाचपाट्यांच्या पोटात दुखणारच! कालपर्यंत ज्या ‘धाराशिव लाइव्ह’वर आपल्या बातम्या याव्यात म्हणून तुम्ही फोन करत होता, ज्यांच्या बातम्यांनी तुम्हाला फायदा होत होता, तेव्हा तो आवाज गोड वाटत होता. आज जेव्हा तुमच्याच कारभाराचा पंचनामा होऊ लागला, तेव्हा तोच आवाज तुम्हाला कर्कश वाटू लागला आणि चॅनल ‘अनधिकृत’ असल्याचा साक्षात्कार झाला? वा रे वा! सोयीनुसार बदलली जाणारी ही भूमिकाच तुमच्यातील खोटेपणा सिद्ध करते.
राहिला प्रश्न सुपारी घेण्याचा. अहो, तुम्ही सत्तेत, तुमच्याकडे पैशाचे अमाप सामर्थ्य. सुपारी घ्यायचीच असती तर तुमची घेतली असती, ती अधिक फायद्याची ठरली असती! पण आम्ही विकले जाणारे नाही. उलट, सुपारी देऊन कोणाला संपवायचे राजकारण कोण करते, हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे असल्या पोकळ धमक्या आम्हाला देऊ नका.
तुम्ही आम्हाला ट्रोल करा, सोशल मीडियावर बदनामी करा, पोलिसांवर दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करा… तुमच्या भात्यातली सर्व शस्त्रे वापरा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या हातातील लेखणी ही कोणाची जहागीर नाही, ती जनतेच्या विश्वासाची दौलत आहे. तुमच्या धमक्यांनी आणि दडपशाहीने या लेखणीची शाई संपणार नाही, उलट तिची धार अधिकच तीक्ष्ण होईल.
जनतेचा आवाज थांबणार नाही आणि आमची लेखणी तर त्याहूनही नाही!
-सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह