धाराशिव: खोटे लग्न लावून एका ३३ वर्षीय तरुणाला १ लाख २० हजार रुपयांना फसवल्याची घटना धाराशिव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन महिलांसह एकूण पाच जणांविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब हरिभाऊ मोरे (वय ३३, रा. वडगाव सि., ता. जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट २०२५ ते २६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून बाळासाहेब मोरे यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी तोतयागिरी करून मोरे यांचा खोटा विवाह लावून दिला आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये घेतले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बाळासाहेब मोरे यांनी २६ ऑगस्ट रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी:
- युवराज पाटील (रा. पाटण, जि. सातारा)
- दशरथ जहागीरदार (रा. पाटण, जि. सातारा)
- शांताबाई (रा. बैलबाजार, कराड)
- अविनाश मिलींद साळवे (रा. वडाळा ईस्ट, मुंबई)
- दिपाली अविनाश साळवे (रा. पाटण, जि. सातारा)
या पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.