पहिल्या डावात तोंडावर आपटल्यानंतर पावशेरसिंहाच्या दरबारात भयाण शांतता होती. कवी कंदीलकरांच्या डोक्यातला विचारांचा कंदील पार विझून गेला होता. अशा शांततेत पावशेरसिंहाला आपला भूतकाळ आठवू लागला. एक काळ होता, जेव्हा ते बारामतीच्या ‘चंद्र राजा’चे मांडलिक होते. चंद्र राजाच्या प्रकाशात त्यांचे राजकारण कसेबसे चमकत होते. पण जसे इंद्रधनुष्य उगवण्यापूर्वी काळे ढग येतात, तसे महाराष्ट्राच्या राजकारणात ‘इंद्र राजा’चे वादळ आले. आपल्या सत्तेचा वायफाय अबाधित ठेवण्यासाठी पावशेरसिंहाने एका रात्रीत चंद्र राजाच्या पौर्णिमेला अमावास्येचा धोका दिला आणि थेट इंद्र राजाच्या दरबारात मुजरा घातला. निष्ठा बदलणे त्यांच्यासाठी सिमकार्ड बदलण्याइतके सोपे होते.
‘जातभाई’ आणि ‘काळा दिवस’
इंद्र राजाच्या दरबारात आपली खुर्ची पक्की करण्यासाठी पावशेरसिंह कोणत्याही थराला जायला तयार होते. एकदा त्यांच्याच जातभाईने आरक्षणाच्या हक्कासाठी मोठा लढा उभारला आणि थेट इंद्र राजावरच टीकेची तोफ डागली. आता स्वामीनिष्ठा दाखवायची हीच ती वेळ, हे पावशेरसिंहाने ओळखले. त्यांनी तात्काळ फेसबुक लाइव्ह करून आपल्याच जातभाईच्या लढ्याला ‘काळा दिवस’ म्हणून संबोधले. त्यांना वाटले इंद्र राजा खुश होईल आणि आपल्याला मंत्रीपद देईल. पण झाले उलटेच. इंद्र राजाने दखल घेतली नाही, पण त्यांचे जातभाई मात्र इतके खवळले की त्यांनी पावशेरसिंहाच्या नावाने शिमगाच सुरू केला.या चुकीचा पहिला हप्ता लोकसभा निवडणुकीत भरावा लागला.
राणीसाहेबांचे घड्याळ आणि साडेतीन लाखांचे बिल
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. पावशेरसिंहाने आपल्या राणीसाहेबांना सूर्यराजे ‘वाघ’ यांच्या विरोधात मैदानात उतरवले. राणीसाहेबांच्या हातात ‘घड्याळ’ बांधले होते, पण त्याची टिकटिक त्यांच्या काळजाची धडधडच वाढवत होती. पाण्यासारखा पैसा खर्च झाला. कवी कंदीलकरांनी तर आयडियांचा रतीब घातला. “आपण प्रत्येक घराच्या भिंतीवर एक घड्याळ लावू आणि लोकांना सांगू, तुमचा चांगला ‘वेळ’ आम्हीच आणणार!”… “आपण घड्याळाच्या सेलसोबत मताची गॅरंटी घेऊ!”… अशा अनेक भन्नाट आयडिया धुळीस मिळाल्या.
निकाल लागला आणि धाराशिवच्या राजकारणात त्सुनामी आली. सूर्यराजे वाघाच्या डरकाळीपुढे राणीसाहेबांचा साडेतीन लाख मतांनी दारुण पराभव झाला. हा पराभव नव्हता, तर पावशेरसिंहाच्या स्वाभिमानाचे निघालेले धिंडवडे होते.
डळमळीत सिंहासन आणि ‘ओवाळणी’चा आधार
या पराभवाने पावशेरसिंहाचे स्वतःचे सिंहासन देखील जमिनीपासून चार इंच वर उचलले जाऊन हलू लागले होते. पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी ठरवले की इंद्र राजाच्या हातातले ‘कमळ’ घेऊन काही खरे नाही, आपण आपलाच ‘कंदील’ पेटवावा. पण ही बातमी कळताच इंद्र राजाने दिल्लीतून असा काही फोन फिरवला की पावशेरसिंहाच्या हातातला कंदील भीतीने विझून गेला.
पावशेरसिंहाची नाव बुडणार, इतक्यात इंद्र राजानेच मदतीचा हात पुढे केला. त्यांनी राज्यातल्या लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपयांची ‘ओवाळणी’ सुरू केली आणि सरकार परत आल्यास २१०० रुपये देण्याची घोषणा केली. या एका घोषणेने निवडणुकीचे चित्र पालटले. मतदार जातभाईचा अपमान विसरले, राणीसाहेबांचा पराभव विसरले आणि ओवाळणीच्या मोहात पडले. पावशेरसिंह स्वतःची जागा अगदी थोडक्यात वाचवू शकले.
अधुरं स्वप्न आणि नवा डाव
निवडणूक तर जिंकली, पण पावशेरसिंहाच्या मनातली मंत्रीपदाची खुर्ची रिकामीच राहिली. इंद्र राजाने त्यांना मंत्रीपद न देता, मित्रमंडळ समितीचे उपाध्यक्ष देऊन त्यांची बोळवण केली. हे पद म्हणजे ‘पाय मोठी पण चप्पल लहान’ असे झाले होते.
मंत्रीपद न मिळाल्याने खवळलेला हा ‘पावशेर’ सिंह आता अधिकच धोकादायक बनला होता. जनतेच्या दरबारात आपण बोरूबहाद्दरला हरवू शकलो नाही, हे त्याला कळून चुकले होते. आता त्याने आपला मोर्चा जिल्ह्याचे हुकुमदार (जिल्हाधिकारी) आणि कायदा रक्षक (पोलीस अधीक्षक) यांच्याकडे वळवला. कायदा रक्षकावर दबाव टाकून, बोरूबहाद्दरला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा नवा, विषारी डाव त्याने रचायला सुरुवात केली होती.
- पुढील भागात पावशेरसिंह यांच्या आणखी भन्नाट गोष्टी वाचा…






