धाराशिव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, कळंब, येरमाळा आणि उमरगा तालुक्यात घरफोडी, दुकान फोडून मुद्देमाल लंपास करणे आणि वाहनचोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण १ लाख १३ हजारांपेक्षा जास्त किमतीचा ऐवज चोरून नेला असून, पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कळंबमध्ये दिवसाढवळ्या दोन घरे फोडली
कळंब तालुक्यातील सावरगाव येथील बायपास रोडवर राहणारे ७३ वर्षीय रंगनाथ निवृत्ती कोल्हे आणि त्यांचे शेजारी शंकर लक्ष्मण करपे यांच्या बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. २५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दोनच्या सुमारास, अज्ञात चोरांनी दोन्ही घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १७,६२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी रंगनाथ कोल्हे यांनी २७ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येरमाळ्यात दुकान फोडून ७५ हजारांचा माल लंपास
दुसरी घटना कळंब तालुक्यातील येरमाळा येथे घडली. येथील शशिकांत अरुण बारकुल (वय ३७) यांचे दुधळवाडी पाटी येथील दुकान अज्ञात चोरांनी फोडले. २५ ऑगस्टच्या रात्री आठ ते २६ ऑगस्टच्या सकाळी दहाच्या दरम्यान चोरांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातून पाण्याची मोटर, स्वयंपाकाची पातेली, ॲम्प्लीफायर, वजन काटा, ज्वारीची ४ कट्टे, गव्हाचे ३ कट्टे आणि माईक स्पीकरचे ५ युनिट असा अंदाजे ७५,९०० रुपये किमतीचा माल चोरून नेला. याप्रकरणी शशिकांत बारकुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३४(१) आणि ३०५(ए) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उमरग्यातून मोटरसायकल चोरी
उमरगा शहरातून वाहनचोरीची घटना समोर आली आहे. तुगाव येथील देविदास नामदेव राठोड (वय ४०) यांची एमएच २५ एक्यू ८९२४ क्रमांकाची मोटरसायकल उमरगा येथील विजय क्लिनिक समोरून चोरीला गेली. २४ ऑगस्टच्या मध्यरात्री ते २५ ऑगस्टच्या पहाटे सहाच्या दरम्यान ही घटना घडली. या मोटरसायकलची किंमत अंदाजे २०,००० रुपये आहे. देविदास राठोड यांनी २७ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्याच्या विविध भागांत एकाच वेळी घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस तिन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.