प्राणी संग्रहालयाच्या ‘सांगाडा’ आयडियानंतर पावशेरसिंह हे विनोदाचा नाही, तर कीवचा विषय बनले होते. त्यांच्या प्रत्येक घोषणेकडे लोक आता संशयाने पाहू लागले होते. पण हे सिंहासन इतके डळमळीत का होते? याची मुळे त्यांच्या वडिलोपार्जित गादीच्या रक्तरंजित इतिहासात दडलेली होती.
पावशेरसिंहाचे वडील ‘सव्वाशेरसिंह’! नावाप्रमाणेच ते पावशेरसिंहापेक्षा सव्वापट भारी होते. बारामतीच्या चंद्र राजाचे एकेकाळचे ते जोडीदार. चंद्र राजाच्या कृपेने अनेक जहागिरी त्यांच्या पदरात पडल्या होत्या. पण सत्तेच्या खेळात कोणीच कोणाचा नसतो. सव्वाशेरसिंहांना त्यांचेच बंधू आणि सूर्यराजेंचे वडील ‘दिलदारराजे’ यांनी २००४ च्या निवडणुकीत जवळपास पाणी पाजले होते. हा अपमान सव्वाशेरसिंह विसरले नाहीत. पुढे २००६ साली दिलदारराजे यांचा खून झाला आणि त्याचे खापर थेट सव्वाशेरसिंहांवर फोडण्यात आले. राज्याच्या राजकारणात भूकंप झाला.
या गंभीर आरोपानंतर बारामतीच्या चंद्र राजानेच सव्वाशेरसिंहांना ‘राजकारणातून विश्रांती घेण्याचा’ सल्ला दिला. हा सल्ला नव्हता, तर राजेशाही पद्धतीचा नारळ होता. याच काळात दोन तरुण रक्ताची दोन झाडे उगवली. एकीकडे वडिलांना मिळालेल्या अज्ञातवासाचा फायदा घेत ‘पावशेरसिंह’ गादीवर बसले, तर दुसरीकडे आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ‘सूर्यराजे’ यांनी दंड थोपटले.
पुढे सव्वाशेरसिहांना अटक झाली, जामीन मिळाला, पण त्यांचे राजकारण कायमचे संपले. दुसरीकडे पावशेरसिंह याना वडिलांची गादी तर मिळाली, पण पावशेरसिंहांनी हुशार सल्लागारांऐवजी भाट आणि चमचे दरबारात जमा केले. याचा परिणाम असा झाला की, ते विधानसभा हरले, लोकसभा हरले, राणीसाहेब तर मतांच्या त्सुनामीत वाहून गेल्या. धाराशिवमधून बस्तान गुंडाळून मुंबईला जाण्याची वेळ आली होती. पण शेवटच्या क्षणी त्यांनी आपल्या राजकीय पित्याला, चंद्र राजाला, धोका दिला आणि इंद्रराजापुढे शरणागती पत्करली. त्यामुळे त्यांची खुर्ची वाचली, पण स्वाभिमान गहाण पडला.
तुळशीचे रोपटे विरुद्ध धगधगती मशाल
हाच तो इतिहास होता, जो सूर्यराजेंना ‘फायर’ बनवत होता. ते आक्रमक होते, दबंग होते. त्यांच्या शब्दाशब्दातून आग निघत होती, त्यामुळे तरुण पिढी आणि जातभाई त्यांच्या मागे धगधगधगत्या मशालीसारखे उभे होते. याउलट, पावशेरसिंह! वरून दिसायला शांत, सभ्य, जणू तुळशीतले रोपटे. पण आतून कटकारस्थानांचे असे जाळे विणायचे की कोळीही थक्क व्हावा. ते इंद्रराजाकडे जिल्ह्याच्या विकासासाठी नाही, तर स्वतःची वडिलोपार्जित संपत्ती वाचवण्यासाठी गेले होते, हे आता धाराशिवमधील लहान मुलालाही कळत होते.
राजा आणि सेनापती: एकाच म्यानात दोन तलवारी
इंद्रराजालाही पावशेरसिंहाच्या क्षमतेवर शंका होतीच. त्यातच प्राणी संग्रहालयाच्या प्रकरणामुळे तर त्यावर शिक्कामोर्तब झाले. म्हणून इंद्रराजाने एक नवी खेळी खेळली. त्यांनी धाराशिवचे पालकत्व (पालकमंत्री पद) सत्तेतील भागीदार असलेल्या ठाण्याच्या ‘सरसेनापतीं’कडे दिले. हा पावशेरसिंहांसाठी सर्वात मोठा अपमान होता. म्हणजे जिल्हा माझा, पण त्यावर रिमोट कंट्रोल ठाण्याचा! पावशेरसिंहांची मोठी कोंडी झाली.
या अपमानाचा बदला घेण्यासाठी पावशेरसिंहांनी आपला नात्यातला हुकमी एक्का बाहेर काढला. राज्याच्या तिजोरीची चावी असलेल्या ‘दादां’ना फोन फिरवला आणि सरसेनापतींनी मंजूर केलेल्या २६८ कोटींच्या विकास निधीला स्थगिती (स्टे) आणली.
आता सरसेनापती तरी गप्प बसतील का? त्यांनीही हिशोब बरोबर केला. पावशेरसिंहाच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या धाराशिव शहरातील रस्त्यांचे १४० कोटींचे टेंडर थेट रद्द करून टाकले. यालाच म्हणतात, ‘तुम डाल डाल, तो हम पात पात’. या राजा आणि सेनापतीच्या थेट संघर्षात धाराशिवच्या विकासाचा वायफाय पार ‘नो नेटवर्क झोन’ मध्ये गेला होता.
बोरूबहाद्दर हे सर्व शांतपणे पाहत होता. त्याला आता काही लिहिण्याची गरजच नव्हती. हे नेतेच एकमेकांची वस्त्रे फेडत होते. त्याने फक्त आपल्या वर्तमानपत्रात एक मथळा दिला:
“राजा-सेनापतीच्या अहंकाराच्या लढाईत, धाराशिवच्या विकासाचा मुडदा!”
पावशेरसिंहाच्या अडचणी आता चहूबाजूंनी वाढत होत्या. एका बाजूला सूर्यराजे, दुसऱ्या बाजूला बोरूबहाद्दर आणि आता घरातच एक सरसेनापती. या चक्रव्यूहातून ते कसे बाहेर पडणार?
…हे पाहूया पुढच्या भागात.






