धाराशिव जिल्हा देशात तिसरा मागास आल्याची बातमी लोकांच्या मनात ताजी होती. चाळीस वर्षांच्या सत्तेचा हिशोब जनता मनातल्या मनात मांडत होती. पावशेरसिंहाने याच मागास जिल्ह्याला लुटून पुणे-मुंबईत संपत्तीचे इमले बांधलेत, यावर आता शिक्कामोर्तब झाले होते. लोकांचा संताप धुमसत होता, इतक्यात निसर्गानेही जिल्ह्यावर आपला राग काढला.
जिल्ह्याची ओळख दुष्काळी… पण यावर्षी अस्मानी संकट उलट्या रूपाने आले. जेव्हा पिकांना पाण्याची गरज होती, तेव्हा आभाळ कोरडे ठणठणीत होते आणि आता जेव्हा सोयाबीन काढणीला आले, तेव्हा पावसाने असे काही धु धु धुतले की शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी आणि शेतातून पिकांचे अवशेष वाहून गेले. शेतांना गुडघाभर पाण्याच्या तलावाचे स्वरूप आले.
अशा गंभीर परिस्थितीत, पावशेरसिंहांनी आपला नेहमीचा ‘टेक्नो-सॅव्ही’ अवतार धारण केला. चिखलात पाय घालायची त्यांना सवय नव्हतीच. त्यांनी आपल्या थंडगार महालातून फेसबुक लाईव्ह सुरू केले. चेहऱ्यावर उसनं अवसान आणून ते शेतकऱ्यांना सल्ला देऊ लागले, “शेतकरी बांधवांनो, घाबरू नका! आपले इंद्रराजा दयाळू आहेत, ते तुम्हाला नक्की मदत करतील. मी स्वतः त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहे.”
आणि कहर म्हणजे, नुकसानीची पाहणी करण्यासाठी तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्यांना पाठवण्याऐवजी, त्यांनी शेतकऱ्यांनाच आवाहन केले, “तुम्ही तुमच्या नुकसानीचे फोटो माझ्या फेसबुक पेजवर कमेंटमध्ये टाका, आम्ही त्याची नोंद घेऊ!”
हे ऐकून संतप्त शेतकऱ्यांच्या डोक्यात तिडीक गेली. त्यांनी फेसबुकवर फोटो टाकण्याऐवजी कॉमेंट बॉक्समध्ये शिव्यांची लाखोली वाहिली. एकाने लिहिले, “साहेब, फोटो काढायला मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आणि चार्जिंग करायला गावात वीज नाही, त्याचं काय?”
त्याच वेळी, दुसरीकडे सूर्यराजे मात्र पॅन्ट गुडघ्यापर्यंत दुमडून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. ते चिखल तुडवत होते, शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचे दुःख ऐकत होते. त्यांना पाहून लोकांच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडले, “हा आपला माणूस आहे! त्या फेसबुकवाल्या पावशेरसिंहपेक्षा हा चिखलातला सूर्यराजा बरा!” सूर्यराजेंच्या नावाचा जयजयकार सुरू झाला.
जुने गाजर विसरवण्यासाठी नवीन महा-गाजर!
सूर्यराजेंचा वाढता प्रतिसाद पाहून पावशेरसिंहांनी ‘डॅमेज कंट्रोल’साठी आपली सर्वात जुनी आणि विश्वासू योजना बाहेर काढली – ‘अशक्य घोषणेचे महा-गाजर!’
त्यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली. “धाराशिवच्या जनतेसाठी ऐतिहासिक बातमी! कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचे पुराचे तब्बल ५० टीएमसी पाणी आपण मराठवाड्याकडे वळवणार आहोत आणि याचा सर्वात मोठा लाभ आपल्या जिल्ह्याला होणार आहे!”
पत्रकार चक्रावले. एका जुन्या पत्रकाराने प्रश्न विचारला, “साहेब, पण पूर्वीच्या २१ टीएमसी पाण्याच्या घोषणेचे काय झाले? गेली चाळीस वर्षे तेच गाजर दाखवले जात आहे. त्यापैकी फक्त ७ टीएमसीचे काम सुरू आहे.”
दुसरा पत्रकार म्हणाला, “साहेब, मागच्या डिसेंबरमध्ये तुम्ही याच ७ टीएमसीचे पाणी आले म्हणून नारळ फोडून उद्घाटन केले होते. वर्ष झाले, अजून पाण्याचा एक थेंब आला नाही, त्याचे काय?”
या प्रश्नांवर पावशेरसिंह किंचितही विचलित झाले नाहीत. ते सराईतपणे म्हणाले, “अहो, ते जुने विषय झाले. आता मी तुम्हाला २१ नाही, तर थेट ५० टीएमसीबद्दल बोलतोय! आपण छोट्या गोष्टींमध्ये अडकायचे नाही, विचार मोठा ठेवायचा!”
त्यांचा डाव स्पष्ट होता. जुन्या, न पूर्ण झालेल्या ७ टीएमसीच्या आश्वासनावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी त्यांनी १५ हजार कोटी रुपयांच्या ५० टीएमसी पाण्याचे महा-गाजर पुढे केले होते.
मृगजळ आणि कोरडे नळ
पण बोरूबहाद्दर आणि सूर्यराजे गप्प बसणारे नव्हते. सूर्यराजेंनी सभांमधून आवाज उठवायला सुरुवात केली. “अरे, ज्या इंद्रराजाच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे, ते १५ हजार कोटी कुठून आणणार? आधी सांगा, मागच्या वर्षी नारळ फोडलेल्या योजनेचे पाणी कुठे मुरले?”
बोरूबहाद्दरने आपल्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर दोन फोटो छापले. एका बाजूला पावशेरसिंहाचा मागच्या वर्षी पाणीपूजन करतानाचा हसरा फोटो आणि दुसऱ्या बाजूला त्याच योजनेचा कोरडा ठणठणीत पडलेला जलवाहिनीचा फोटो. आणि त्याखाली एकच मथळा दिला:
“५० TMC चे मृगजळ दाखवण्यापूर्वी, जुन्या ७ TMC च्या कोरड्या नळाचे उत्तर द्या!”
पावशेरसिंहाचा डाव त्यांच्यावरच उलटला होता. शेतकऱ्यांच्या नुकसानीवर फुंकर घालण्याऐवजी त्यांनी दाखवलेले विकासाचे मृगजळ आता त्यांच्याच राजकीय करिअरसाठी धोकादायक ठरत होते.
…हे पाहूया पुढच्या भागात.