धाराशिव : धाराशिव शहरातील निंबाळकर गल्लीत एका घरावर छापा टाकून शहर पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ३० ऑगस्ट २०२५) रात्री सव्वादहाच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी आठ जणांना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दोन दुचाकींसह एकूण १ लाख ५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत धाराशिव शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, निंबाळकर गल्लीतील गणेश निंबाळकर यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर काही इसम पैसे लावून ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शनिवारी रात्री छापा टाकला असता, आठ जण गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले.
या प्रकरणी सर्फराज कुरेशी, सुनिल कुंभार, बालाजी अलकुंटे, संदिप शिंदे, दत्ता मुंडे, नरहरी चव्हाण, अरविंद गोरे आणि आशोक वाघमारे (सर्व रा. धाराशिव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून जुगारासाठी वापरण्यात आलेली रोख रक्कम, पत्ते, महागडे मोबाईल फोन आणि दोन दुचाकी (एक बजाज डिस्कव्हर क्र. एमएच २५ सी ३४८९ आणि एक टीव्हीएस ज्युपिटर क्र. एमएच २५ एटी ०८८२) असा एकूण १,०५,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत आडगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४१६/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या आरोपींचा कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करत आहेत.




