कळंब : जागेच्या वादातून कळंब येथील एका कापड व्यापाऱ्याला दुकान चालवण्यासाठी दरमहा दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास दुकान चालू देणार नाही आणि खोट्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी दिल्याप्रकरणी कळंब आणि लातूर येथील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मयुर जयप्रकाश रुणवाल (वय ३९, रा. कळंब) यांनी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचे ढोकी रोडवर ‘मयुर साडी सेंटर’ नावाचे दुकान आहे. जागेच्या वादातून आरोपींनी १० ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवली.
आरोपींनी मयुर रुणवाल यांना, “तुला जर मयुर साडीचे दुकान चालवायचे असेल तर दर महिन्याला दोन लाख रुपये दे, नाहीतर तुझे दुकान चालू देणार नाही. दुकान उघडल्यास तुला सोडणार नाही व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू,” अशी गंभीर धमकी दिली. इतकेच नाही, तर आरोपींनी त्यांच्या दुकानाच्या शटरवर स्वतःच्या नावाचे पोस्टरही लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी लखन विजय गायकवाड, अमर विजय गायकवाड, अमित भारत जाधव, रोहीत हौसलमल (सर्व रा. कळंब) तसेच शितल बलदोटा, पंकज काटे, शितल काटे (सर्व रा. लातूर) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मयुर रुणवाल यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार (कलम ३०८(२), १८९(२), १९१(२), १९०(२), ३२९(३), ३५१(२)) गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




