सूर्यराजेंनी लोकसभा निवडणुकीत सलग दोनदा पावशेरसिंहाच्या साम्राज्याला हादरे दिले होते. पहिल्यांदा स्वतः पावशेरसिंहांना आणि दुसऱ्यांदा राणीसाहेबांना धूळ चारून त्यांनी दिल्लीतील आपली जागा पक्की केली होती. सूर्यराजेंचा दराराच तसा होता – ‘फायर’, आक्रमक, दबंग! त्यांच्या शब्दांतून जणू ठिणग्या बाहेर पडायच्या.
याउलट, पावशेरसिंहांची अवस्था बोलायला गेले की चाचपडण्यासारखी स्थिती होती. त्यांच्या भाषणांनी कधी कुणाला प्रेरणा मिळाली नाही. यावर उपाय म्हणून आणि सूर्यराजेंना ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी पावशेरसिंहाने आपला ‘सुपुत्र’ गब्बरसिंह याला मैदानात उतरवले. गब्बरसिंह नावाप्रमाणेच गब्बर होता. एकदा जाहीर सभेत तो म्हणाला, “काय ते सूर्यराजे सूर्यराजे लावलंय! मी माझा खिसा झटकला तरी असे पाच -पन्नास सूर्यराजे बाहेर पडतील!”
हे ऐकून दरबारातील चमच्यांनी टाळ्या वाजवल्या, पण जनतेच्या डोक्यात मात्र वेगळाच प्रकाश पडला. लोकांना खात्री पटली की पावशेरसिंहाने जिल्ह्याला लुटून प्रचंड माया जमवली आहे. बोरूबहाद्दरने तर दुसऱ्याच दिवशी निवडणूक प्रतिज्ञापत्राचे आकडे छापले आणि गब्बरसिंहाच्या वक्तव्याचा अर्थ उलगडून दाखवला. मथळा होता – “जिल्हा मागास, पण ‘खिसा’ मालामाल!”
गळके बस स्थानक आणि विकासाचे नवे मॉडेल
लोकसभेतील पराभवानंतर पावशेरसिंहांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला. मतदारसंघ बदलला आणि जगदंबा देवीच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या शहरात आले. इथे देवीची सेवा करण्याऐवजी ‘मलिदा’ कसा लाटता येईल, यासाठी त्यांनी विकासाचे एक नवे मॉडेल सादर केले. आठ कोटी रुपये खर्चून बांधलेले नवे बस स्थानक पहिल्याच पावसात गळू लागले. छताखाली उभे राहण्याऐवजी लोक बाहेर पावसात उभे राहू लागले. “यापेक्षा जनावरांचा गोठा बरा!” अशा शिव्या लोक घालू लागले. दोन कोटींचे काम आठ कोटींत दाखवून सहा कोटी कुठे गायब झाले, याचा हिशोब आता जनताच विचारत होती.
देवीचा निधी, ड्रग्जचा आरोपी आणि नागपूरचे पोलार्ड
पावशेरसिंहाचा ढोंगीपणा इथेच थांबला नाही. जगदंबा देवीच्या मंदिर विकासासाठी इंद्रराजाने १६३५ कोटी रुपये मंजूर केले, अशी मोठी आवई उठवण्यात आली. या ‘घोषणापूर्ती’बद्दल नागपूरच्या ‘पोलार्ड’ यांचा सत्कार सोहळा आयोजित केला. पण गंमत म्हणजे, या सोहळ्याचा मुख्य आयोजक ड्रग्ज प्रकरणातील एक आरोपी होता. नागपूरच्या पोलार्ड यांनी व्यासपीठावरून याच आरोपीचे तोंड भरून कौतुक केले.
बोरूबहाद्दरसहित सर्व पत्रकारांनी ही बातमी उचलून धरली. “देवीच्या नावाने होणाऱ्या कार्यक्रमात ड्रग्जच्या आरोपीचा सन्मान!” अशा बातम्यांनी राज्यभर खळबळ उडाली. पोलार्ड अडचणीत आले. आपला विश्वासघात झाल्याने ते पावशेरसिंहांवर प्रचंड नाराज झाले आणि पर्यायाने इंद्रराजाचाही पारा चढला.
या प्रकरणातील सर्वात मोठा विनोद म्हणजे, १६३५ कोटींचा केवळ ‘शब्द’ दिला गेला होता, तिजोरीतून एक रुपयाही सुटला नव्हता. मंदिराची जी काही किरकोळ कामे सुरू होती, ती भक्तांच्या देणगीतून सुरू होती.
समितीचा वाद आणि वादग्रस्त मुंबई बैठक
देवीच्या विकास निधी समितीचे अध्यक्षपदही ठाण्याच्या सरसेनापतींकडे होते आणि सूर्यराजे त्याचे सदस्य होते. त्यामुळे पावशेरसिंहांची अवस्था ‘नावाला राजा, पण अधिकाराने शिपाई’ अशी झाली होती. मंदिरातील पुजारीही दोन गटांत विभागले गेले. देवीच्या डोंगरावर १०८ फुटी मूर्ती बसवण्यावरून मोठा वाद पेटला.
हा वाद सोडवण्यासाठी पावशेरसिंहांनी इंद्रराजाचे सहकारी आणि सांस्कृतिक कार्यभार सांभाळणाऱ्या ‘वांद्रेकर’ यांच्याकडे मुंबईत बैठकीची विनंती केली. इथेही त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. सुरुवातीला बैठकीच्या निमंत्रण यादीतून ठाणेकर सरसेनापती आणि सूर्यराजे यांना वगळले. वाद झाल्यावर नावे टाकली आणि ऐनवेळी पुन्हा वगळली. आणि कहर म्हणजे, या अधिकृत बैठकीला त्यांनी त्याच ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या राईट हॅन्डला म्हणजे ‘आका’ला सोबत नेले.या आकावर खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, जुगार आदी २५ हुन अधिक गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये आहे. या आकाला पोलिसांनी तडीपार देखील केले होते. त्याच आकाला पावशेरसिंह यांनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा बदनामीच्या चक्रव्यूहात अडकले.
ही बातमी बाहेर येताच पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात धुरळा उडाला. देवीच्या विकासाच्या बैठकीला कुख्यात गुन्हेगाराचा संबंध काय? पावशेरसिंह आता विकासाच्या मुद्द्यांवरून नाही, तर स्वतःच्याच एकापाठोपाठ एक चुकांमुळे चर्चेत होते. ते एका दलदलीतून निघून दुसऱ्या दलदलीत फसत होते.
…हे पाहूया पुढच्या भागात.