उमरगा – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर तब्बल सहा वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची आणि या कृत्याचे मोबाईलवर चित्रीकरण करून ते प्रसारीत करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उमरगा तालुक्यात उघडकीस आला आहे. पीडित तरुणी घटनेच्या सुरुवातीला अल्पवयीन असल्याने आरोपी तरुणावर लैंगिक अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात ही नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील एका गावातील २३ वर्षीय पीडित तरुणीवर एका तरुणाने १८ डिसेंबर २०१९ पासून अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पीडिता अल्पवयीन होती. आरोपी तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली आणि त्यानंतर एप्रिल २०२५ पर्यंत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.
या दरम्यान, आरोपीने या अत्याचाराचे मोबाईल फोनवर चित्रीकरण केले होते. याच व्हिडीओच्या आधारे तो पीडितेला धमकावत होता. जर तिने याबद्दल कोणाला सांगितले किंवा विरोध केला, तर तो हा व्हिडीओ सर्वत्र प्रसारीत करेल, अशी धमकी देऊन त्याने तिचे शोषण सुरू ठेवले होते.
अखेर हा सर्व प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितला. यानंतर पीडितेच्या आईने २ सप्टेंबर २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ सह पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.