नळदुर्ग – “आमच्या घराकडे तोंड करून का बसला आहेस?” या क्षुल्लक कारणावरून तसेच भावाने प्लॉट घेतल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीला कोयता आणि काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तालुक्यातील किलज येथे २ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.
याप्रकरणी आनंद मुकुंद गायकवाड (वय ४४, रा. किलज) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांचे भाऊ यांनी गावात एक प्लॉट खरेदी केला होता. याचा राग आरोपींच्या मनात होता. २ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आनंद गायकवाड हे किलज गावात असताना आरोपींनी त्यांना पाहिले.
“आमच्या घराकडे तोंड करून का बसला आहेस?” असे म्हणत आरोपींनी गायकवाड यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि कोयत्याने मारहाण करून जखमी केले. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे गायकवाड यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून, नळदुर्ग पोलिसांनी नामदेव विठ्ठल ढाले, विलास विठ्ठल ढाले आणि सुकुमारबाई विठ्ठल ढाले (सर्व रा. किलज) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.