भूम – मुलांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीने आधी मुलाला आणि नंतर त्याच्या वडिलांना मारहाण केली. इतकेच नाही, तर तलवार घेऊन वडिलांच्या अंगावर धावून जात दहशत निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना तालुक्यातील गणेगाव येथे जिल्हा परिषद शाळेसमोर २ सप्टेंबर रोजी घडली.
याप्रकरणी महावीर बाबुराव जाधव (वय ४०, रा. गणेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर जाधव यांच्या मुलाचे आणि आरोपी हनुमंत भारत साळुंके (रा. गणेगाव) यांच्यात काही कारणावरून भांडण झाले होते.
या भांडणाचा राग मनात धरून आरोपी हनुमंत साळुंके याने २ सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास गणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोर आधी जाधव यांच्या मुलाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर, त्याने फिर्यादी महावीर जाधव यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली आणि तलवार घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
महावीर जाधव यांनी ३ सप्टेंबर रोजी भूम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हनुमंत साळुंके याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.