धाराशिव : जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट वाढला असून, परंडा आणि धाराशिव शहरात चोरीच्या तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये एकूण १ लाख ३७ हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली आणि काही बोकडे अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
पहिली घटना परंडा तालुक्यातील भूम-वारदवाडी रोडवर घडली. फिर्यादी दिपक अंकुश शिंदे (वय ३०, रा. चुर्मापुरी, ता. आंबड, जि. जालना) यांनी नायरा पेट्रोल पंपाजवळ त्यांची होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल (क्र. एमएच २१ सीसी ३१७६) उभी केली होती. दि. २९ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने अंदाजे ६०,००० रुपये किमतीची ही मोटरसायकल चोरून नेली. याप्रकरणी दिपक शिंदे यांनी ३ सप्टेंबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरी घटना परंडा तालुक्यातील लोणी येथे घडली. येथील शेतकरी भास्कर धोंडीबा जाधव (वय ६०) यांच्या शेत गट नं. ४७७ मधील पत्र्याच्या शेडमधून अज्ञात व्यक्तीने अंदाजे ७,००० रुपये किमतीचे बोकड चोरून नेले. ही घटना दि. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते दि. २ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. भास्कर जाधव यांनी ३ सप्टेंबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तिसरी घटना धाराशिव शहरातील बाळासाहेब ठाकरे नगर येथे घडली. फिर्यादी सचिन बाबु राठोड (वय २९, रा. रामतिर्थ, ता. तुळजापूर) यांची होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल (क्र. एमएच २५ एझेड ७०२२) घरासमोरून चोरीला गेली. दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने अंदाजे ७०,००० रुपये किमतीची ही मोटरसायकल चोरून नेली. याप्रकरणी सचिन राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३ सप्टेंबर रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या तिन्ही प्रकरणांमध्ये, संबंधित पोलीस ठाण्यांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हे नोंदवून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे. एकाच दिवशी चोरीचे तीन गुन्हे दाखल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.