नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे जमिनीच्या वादातून एका ५० वर्षीय शेतकऱ्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चार जणांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदिप शिवाजी घुगे (वय ५०, रा. अणदूर) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अणदूर शिवारातील त्यांच्या शेतात घडली. जमिनीच्या जुन्या वादातून आरोपी अभिषेक उत्तम घुगे, महेश उद्धव घुगे, नंदुबाई उत्तम घुगे आणि मंगल उद्धव घुगे (सर्व रा. अणदूर) यांनी संगनमत करून प्रदीप घुगे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर वाद वाढला असता, आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने जबर मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर प्रदीप घुगे यांनी ४ सप्टेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.