धाराशिव: मोबाईल फोन देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका ३५ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि विटेने मारहाण करून जखमी केल्याची घटना धाराशिव शहरातील साठेनगर भागात घडली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश भारत रणदिवे (वय ३५, रा. साठेनगर, धाराशिव) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साठेनगर येथील जुन्या बस डेपोजवळ आरोपी किरण रामदास मगर (रा. साठेनगर) याने योगेश रणदिवे यांना मोबाईल फोन देण्यास सांगितले.
रणदिवे यांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या किरण मगर याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नाही, तर त्याने जवळच पडलेल्या विटेने रणदिवे यांना मारहाण करून जखमी केले.
घडलेल्या प्रकारानंतर योगेश रणदिवे यांनी दुसऱ्या दिवशी, म्हणजेच दि. ७ सप्टेंबर रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी किरण रामदास मगर याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.