तुळजापूर: मोटारसायकलची चेन तुटल्याने रस्त्याच्या कडेला गाडी लावून मदतीसाठी पेट्रोल पंपाकडे पायी जाणाऱ्या एका ५२ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. अपघात करून वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, तुळजापूर पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राम अर्जुन कांबळे (वय ५२) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शनिवार, दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते रविवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान वडगाव लाख शिवारातील नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम कांबळे हे आपल्या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना वडगाव लाखजवळ त्यांच्या गाडीची चेन तुटली. त्यामुळे त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि मदतीच्या शोधात समोर असलेल्या नायरा पेट्रोल पंपाकडे पायी निघाले होते. त्याचवेळी, भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनचालकाने हयगयीने व निष्काळजीपणे गाडी चालवून राम कांबळे यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झाल्याने राम कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने जखमीस मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला.
याप्रकरणी कमलाकर भिवा पवार (वय ५२, रा. वाडीबामणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस फरार वाहनचालकाचा आणि वाहनाचा शोध घेत आहेत.