नळदुर्ग: शहरात पैगंबर जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) आयोजित मिरवणुकीत ‘आलमगीर औरंगजेब’ या नावाने घोषणा दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेत एक निवेदन सादर केले आहे. घोषणा देणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
रविवारी नळदुर्ग शहरात ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही तरुणांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक सलोखा आणि शांतता धोक्यात आणणाऱ्या या प्रकारावर सर्वच स्तरांतून टीका होत होती.
हिंदू नागरिकांची पोलीस ठाण्यात धाव
आज शहरातील अनेक हिंदू नागरिक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नळदुर्ग पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणी जबाबदार असलेल्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नळदुर्गचे औरंगजेबी विष: मुळावर घाव कधी घालणार?
या निवेदनामुळे पोलीस प्रशासनावरील दबाव वाढला आहे. पोलीस व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता तपासून घोषणा देणाऱ्यांची ओळख पटवत आहेत. आता निवेदन दाखल झाल्याने गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता आहे. शहरातील वातावरण तणावपूर्ण पण शांत असून, पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.