महाराष्ट्राच्या मातीला शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि सर्वधर्मसमभावाचा समृद्ध वारसा आहे. याच मातीत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर शत्रू, धर्मछल करणारा क्रूरकर्मा औरंगजेब याच्या नावाचा जयघोष होतो, तेव्हा तो केवळ काही तरुणांचा पोरकटपणा नसतो, तर समाजाच्या शरीरात भिनत चाललेल्या एका विषारी विचारधारेचा तो उद्रेक असतो. नळदुर्ग शहरात ईद-ए-मिलादच्या दिवशी ‘आलमगीर औरंगजेब’ च्या नावाने दिलेल्या घोषणा ही केवळ एक स्थानिक घटना नाही, तर ती एका मोठ्या आणि अधिक धोकादायक षडयंत्राची धोक्याची घंटा आहे.
हे असे प्रकार अचानक घडत नाहीत. ही एक विचारपूर्वक पेरलेली विषवेल आहे, जी आता समाजात फोफावू लागली आहे. ज्या महाराष्ट्राने औरंगजेबाच्या पाशवी सत्तेला २७ वर्षे झुंजवले, ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी याच औरंगजेबासमोर धर्मासाठी बलिदान दिले, त्या भूमीत औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. ही थेट छत्रपतींच्या स्वाभिमानी परंपरेला दिलेली जखम आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला दिलेले खुले आव्हान आहे. या घटनांमधून एक विशिष्ट मानसिकता घडवली जात आहे, जिथे इतिहासातील खलनायकांना नायक म्हणून गौरवण्याचा आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न आहे.
या प्रवृत्तीला खतपाणी घालणारे घटक अधिक घातक आहेत. अशा घटना घडल्यानंतर ‘सेक्युलॅरिझम’च्या नावाखाली पांघरूण घालणारी राजकीय आणि सामाजिक व्यवस्था याला सर्वस्वी जबाबदार आहे. काही मूठभर समाजकंटकांच्या कृत्यांमुळे संपूर्ण समाजाला जबाबदार धरू नये, हे सत्य आहे; पण त्याचवेळी, त्या समाजातील जबाबदार लोकांनी, मौलवींनी आणि नेत्यांनी पुढे येऊन या कृत्यांचा जाहीर निषेध करणे, त्या तरुणांना समाजातून बहिष्कृत करणे हे त्यांचे कर्तव्य नाही का? ही शांतता, हे मौन अत्यंत बोलके आहे. हे मौन अशा विकृत मानसिकतेला मूक संमती देते आणि त्यामुळेच अशा घटनांची मालिका सुरू राहते.
दुर्दैवाने, मतांच्या राजकारणासाठी यावर उघडपणे बोलायला तथाकथित पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेतेमंडळी घाबरतात. हिंदू समाजातील चुकीच्या गोष्टींवर ताशेरे ओढणारे विचारवंत आणि नेते, अशा घटना घडल्यावर मात्र सोयीस्कररीत्या मौन बाळगतात. हा ढोंगीपणाच या औरंगजेबी विचारधारेसाठी ‘सॉफ्ट स्पॉट’ तयार करतो. कायद्याने आपले काम करावे, ही अपेक्षा योग्यच आहे. नळदुर्गमधील नागरिकांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन आपली सजगता दाखवली आहे. पोलिसांनी या समाजकंटकांवर कठोर कारवाई केलीच पाहिजे, जेणेकरून कायद्याचा धाक निर्माण होईल.
परंतु, हे केवळ कायद्याच्या बडग्याने संपणारे प्रकरण नाही. हा वैचारिक आणि सामाजिक लढा आहे. जोपर्यंत औरंगजेबाला आपला ‘नायक’ मानणारी किडलेली मानसिकता अस्तित्वात आहे, तोपर्यंत हे विष समाजात पसरतच राहील. या मानसिकतेच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे. यासाठी मुस्लिम समाजातील विचारी आणि देशभक्त नागरिकांनीच पुढाकार घ्यायला हवा. आपल्याच घरात वाढणारी ही विषवल्ली वेळीच ठेचून काढली नाही, तर ती उद्या संपूर्ण समाजाला विळखा घालेल, हे त्यांनी ओळखले पाहिजे.
नळदुर्गची घटना एक इशारा आहे. आज घोषणा आहेत, उद्या दगडफेक होईल आणि परवा परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे, प्रशासनाने केवळ गुन्हे दाखल करून थांबू नये, तर यामागे कोणती संघटना आहे, कोणता ‘स्लीपर सेल’ कार्यरत आहे, याचाही शोध घेतला पाहिजे. त्याचबरोबर, समाजानेही आता अशा घटनांकडे दुर्लक्ष करण्याचे सोडून देऊन, एक राष्ट्र म्हणून या विकृतीविरोधात एकजूट दाखवली पाहिजे. कारण हा लढा केवळ इतिहासापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या सुरक्षित आणि एकात्म भविष्यासाठी आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह