भूम – रोजगार हमी योजनेच्या बिलाच्या वादातून भूम पंचायत समितीच्या दोन शासकीय कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तांत्रिक अधिकारी रवी राख आणि त्यांचे सहायक कृष्णा बांगर यांना रस्त्यात अडवून सहा जणांच्या टोळक्याने कोयते, काठ्या आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रवी राख आणि कृष्णा बांगर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना, बोलेरो गाडीने आलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा रस्ता अडवला. काही कळण्याच्या आतच गाडीतून उतरलेल्या सहा तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या बिलावरून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हल्लेखोर हे बीड जिल्ह्यातील एका राजकीय नेत्याचे कार्यकर्ते असल्याची चर्चा असून, मारहाण करून ते घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर जखमी कर्मचाऱ्यांनी वाशी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
या भ्याड हल्ल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जखमी कर्मचाऱ्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.