धाराशिव – हायवेवर चालत्या ट्रकमध्ये चढून मालाची चोरी करणाऱ्या एका टोळीचा थरारक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. याच व्हिडीओच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. येडेश्वरी मंदिरात येणाऱ्या भाविकांना लुटण्याचा त्यांचा डाव होता, जो पोलिसांनी उधळून लावला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मलकापूर पाटीजवळ केली असून, आरोपींकडून महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आणि दरोड्याचे साहित्य असा एकूण ११ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओमुळे लागले धागेदोरे
दिनांक ८ सप्टेंबर रोजी तेरखेडा परिसरात हायवेवर एका चालत्या ट्रकमध्ये काही तरुण चढून मालाची चोरी करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक या चोरांचा शोध घेत असताना, त्यांना गुप्त माहिती मिळाली.
माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओमधील चोरटे मलकापूर पाटी ते येडेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका स्कॉर्पिओ गाडीत थांबले असून, ते देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लुटण्याच्या तयारीत होते.
पोलिसांनी सापळा रचून आवळल्या मुसक्या
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच गाडीतून उतरून दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. गाडीत बसलेल्या इतर चार जणांनाही ताब्यात घेण्यात आले.
अमोल नाना काळे (वय २८), किरण बापू पवार (वय २५), दत्ता दादा काळे (वय २१), गणेश नाना काळे (वय ३२), सुभाष तानाजी काळे (वय २४) आणि शिवा रामा पवार (वय २२, सर्व रा. तेरखेडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुण्यातील ५० लाखांच्या दरोड्यातही सहभाग
तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीतील तीन आरोपी आणि जप्त केलेली स्कॉर्पिओ गाडी पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या ५० लाख रुपयांच्या दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होते. या अटकेमुळे एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके आणि त्यांच्या पथकाने केली आहे.