धाराशिव: “सर, आमच्या शाळेतून जाऊ नका…” असे म्हणत विद्यार्थी अक्षरशः ढसाढसा रडले. आपल्या आवडत्या शिक्षकाची बदली झाल्याचे कळताच त्यांना आपले अश्रू अनावर झाले. हा हृदयस्पर्शी आणि गुरु-शिष्य नात्याची वीण घट्ट करणारा प्रसंग धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दसमेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घडला.
दसमेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रशांत जाधवर यांची नुकतीच बदली झाली. अनेक वर्षे या शाळेत सेवा दिल्यानंतर, त्यांनी आपल्या शिकवण्याने आणि प्रेमळ स्वभावाने विद्यार्थ्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले होते. जेव्हा जाधवर सर शाळा सोडून निघाले, तेव्हा संपूर्ण वातावरण भावुक झाले.
आपले आवडते शिक्षक आता आपल्याला शिकवायला येणार नाहीत, या कल्पनेनेच विद्यार्थ्यांचा धीर सुटला. त्यांनी सरांच्या भोवती गर्दी केली आणि “सर, तुम्ही जाऊ नका,” असा टाहो फोडला. अनेक विद्यार्थी तर सरांना बिलगून रडत होते. या अनपेक्षित आणि भावुक प्रसंगाने स्वतः प्रशांत जाधवर यांचेही डोळे पाणावले. त्यांनाही आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना सोडून जाणे जड झाले होते.
या घटनेमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुंदर नात्याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. एका शिक्षकाने आपल्या कामातून विद्यार्थ्यांच्या मनात किती खोलवर जागा बनवली आहे, हे या प्रसंगातून दिसून आले. हा भावनिक क्षण अनेकांसाठी अंगावर काटा आणणारा ठरला असून, या घटनेची परिसरात मोठी चर्चा होत आहे.
Video