धाराशिव – धाराशिव तालुक्यातील कौडगाव लमाण तांडा येथे एका व्यक्तीला गैरकायदेशीर जमाव जमवून २० जणांनी मिळून जातीवाचक शिवीगाळ करत काठी आणि कुऱ्हाडीने जबर मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात २० आरोपींविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कौडगाव लमाण तांडा येथील रहिवासी विनोद शिवलाल शिंदे (वय ४०) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी (दि. ९ सप्टेंबर) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तांड्यामध्ये राहणाऱ्या २० आरोपींनी संगनमत करून गैरकायदेशीर जमाव जमवला.
या जमावाने विनोद शिंदे यांना गाठून प्रथम जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी, काठी व कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले. इतकेच नाही, तर आरोपींनी शिंदे यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या गंभीर प्रकारानंतर विनोद शिंदे यांनी बुधवारी (दि. १० सप्टेंबर) धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दयानंद चव्हाण, सचिन चव्हाण, योगीराज चव्हाण, संजोग राठोड यांच्यासह एकूण २० जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२), १९० सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा नोंदवला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.